11 October, 2025
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका),दि.११: भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हास्तरीय गळीत धान्य कार्यशाळेचे सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार तानाजीराव मुटकुळे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, सुनील गोडगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश भालेराव, श्रीमती रोहिणी शिंदे उपस्थित होते.
सध्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले आहे त्यानुसार मदत मिळणार आहे असे सांगून राष्ट्रीय खाद्यतेल योजनेचे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन दुपटीने वाढण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. तसेच कृषी समृद्धी योजनेतून साठवणूक क्षमता वाढविण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून चालू आहेत. तसेच रब्बी हंगामात करडईची मोठ्या प्रमाणात लागवड करावी असे सांगितले. शेतकऱ्यांना काहीही अडचण आल्यास जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कचवे यांनी आभार प्रदर्शन केले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ डॉ. राजेश भालेराव यांनी सोयाबीन काढणी पश्चात घ्यावयाची काळजी व करडई पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. श्रीमती रोहिणी शिंदे यांनी सोयाबीन प्रक्रिया पदार्थाबद्दल माहिती सांगून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी सोयाबीनवर प्रक्रिया करावी असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कडोळी येथील श्री रयतेराम महाराज संस्थानच्या सभागृहात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण सर्व शेतकरी बांधवांना दाखवण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जीवन चरित्राच्या घडिपत्रिकेचे तसेच सोयाबीन प्रक्रिया पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment