06 October, 2025
मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून समृद्ध होण्यासाठी नियमित वाचन अत्यावश्यक - अशोक अर्धापूरकर
हिंगोली(जिमाका), दि. 06 : मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून समृद्ध होण्यासाठी नियमित वाचन अत्यावश्यक आहे. तसेच नियमित वाचनाने माणूस संवेदनशील होतो व त्यामुळे जागरुक नागरिक तयार होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित वाचनाचे विविधांगी लाभांबाबत अशोक अर्धापूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषदेचे हिंगोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, औरंगाबाद विभाग ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष गजानन शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे, शंभोनाथ दुभळकर व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दि.14 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून आणि दि. 3 ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार यावर्षी संपन्न होणाऱ्या अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये अभिजात मराठी भाषेबद्दल जागृती व्हावी, अभिजात मराठी विषयक ग्रंथाची माहिती व्हावी, या उद्देषाने विविध साहित्यकृतींचे, विविध ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे करण्यात आले होते. याचे उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषदेचे हिंगोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हे ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांसाठी दि. 9 ऑक्टोबर, 2025 पर्यंत खुले असून वाचक सभासद, नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment