07 October, 2025

नव उद्योजकांनी पुरवठासाखळी निर्मिती उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगवाढीसाठी निर्मिती उद्योगामध्ये विद्यमान उद्योजकांना सलग्न असा पुरवठासाखळी निर्मिती उद्योग उभारण्यासाठी नव उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत केले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात आज उद्योग विभागाच्या अडी-अडचणी एकाच क्षेत्राखाली सोडविण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग वाढ करण्यासाठी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगाविषयी उद्योजकांच्या तक्रारी एक खिडकीद्वारे सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा नोडल अधिकारी यांच्याकडे आपले निवेदन सादर करावे, अशा सूचनाही दिल्या. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उद्योग अधिकारी, उद्योग निरीक्षक उपस्थित होते. तसेच यावेळी उद्योजक नितीन राठोर, प्रवीण हेडा, प्रणत अग्रवाल व इतर उद्योजक उपस्थित होते. ***

No comments: