03 October, 2025
हिंगोली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या कामाचे राज्यस्तरावर झाले कौतुक
हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्ह्यात एड्स नियंत्रण विभागामार्फत एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र, एआरटी औषधोपचार केंद्र, गुप्तरोग केंद्र, रक्त पेढी यांच्यामार्फत शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे खूप चांगले काम होत आहे. शिवाय देहविक्री करणाऱ्या महिलांना व एचआयव्ही संसर्गित महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध सामाजिक लाभाच्या योजनांचा फायदा संबंधितांना विहान व सेतू सेवाभावी संस्थेच्या मदतीने देण्यात येतो.
विशेषतः हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा कुंटणखाना आहे, त्याठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिलांना आरोग्यविषयक सर्व सुविधा डापकुमार्फत पुरवण्यात येत होत्या. परंतु इतर कोणत्याही मूलभूत सुविधा त्यांना मिळत नव्हत्या. राहायला पक्के घर, पिण्याचे पाणी, लाईटची व्यवस्था, शौचालय, परिसरातील रस्ते, अंगणवाडी इत्यादी कोणत्याही सुविधा त्यांना मिळत नव्हत्या.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व त्यांच्या अंतर्गत असलेल्या सेतू सेवाभावी संस्था यांच्यामार्फत सदरील महिलांची दयनीय स्थिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व इतर अधिकारी यांना वेळोवेळी आढावा बैठकीदरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी व सेतूचे प्रकल्प व्यवस्थापक इरफान कुरेशी हे मांडत होते. सेतूचे चेअरमन सतीश त्रिपाठी यांनी स्वतः याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पाठपुरावा केला होता. यानंतर स्वतः जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली, तेथील महिलांशी संवाद साधला.
यानंतर शासकीय यंत्रणेला सूचना देऊन काही काळातच आज त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी एक बोअरवेल, मोटार, सोलार सिस्टीम व आरओ फिल्टर आणि शेड तयार करून पाण्याची व्यवस्था केली. शिवाय तेथील महिलांचे दहा घरकुल प्रस्ताव मंजूर केले. शौचालयचे चौदा प्रस्ताव मंजूर केले, परिसरातील रस्त्यासाठी तीस लाख रुपये व लाईटसाठी दहा लाख रुपये मंजूर झाले. महत्त्वाचे म्हणजे तेथील महिलांच्या लहान मुलांकरिता महाराष्ट्रातील पहिली सब अंगणवाडी याठिकाणी सुरू करण्यात आली. शिवाय जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड , इत्यादी सुविधा त्यांना देण्यात आल्या.
याव्यतिरिक्त एचआयव्ही संसर्गित महिलांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्यात कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर व पॅप स्मियर तपासणी शिबिर घेण्यात आले होते आणि याच नावीन्यपूर्ण कामाची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे दि. 1 ऑक्टोबर, 2025 रोजी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या उपमहासंचालक डॉ. शोभिनी रंजन या आढावा बैठकीसाठी आल्या असताना महाराष्ट्रातून केवळ हिंगोली जिल्ह्याला आपल्या नावीन्यपूर्ण कामाचे प्रेझेन्टेशन करण्यासाठी त्याठिकाणी बोलावण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी व सेतूचे इरफान कुरेशी यांनी आपल्या कामाचे प्रेझेन्टेशन सर्वांसमोर केले असता त्यांचे सर्वांनी कौतुक केले.
यावेळी प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ.नागनाथ मुद्दम, सहाय्यक संचालक डॉ. राहुल जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment