27 October, 2025
"महादेवा" योजनेंतर्गत फुटबॉल खेळण्यासाठी सुवर्णसंधी • 13 वर्षाखालील मुला-मुलींची शुक्रवारी निवड चाचणी
हिंगोली (जिमाका), दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ‘महादेवा’ ही योजना राज्यातील 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळातील कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार आहे.
जिल्हास्तरावरील निवड चाचणी, प्रादेशिक आणि अंतिम निवड फेरी, अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सिडको, खारघर येथे आणि 60 मुलींची निवड डब्ल्यूआयएएफ कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल. यापैकी 30 मुले व मुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल. फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. ही योजना मित्रा, डब्ल्यूआयएफए, सिडको, व्हीएसटीएफ व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे.
राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय महादेवा योजनेअंतर्गत 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी विद्यालय, वसमत येथे करण्यात आले आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी दिनांक 01 जानेवारी 2012 ते दि. 31 डिसेंबर, 2013 या कालावधीतील जन्म असलेल्या खेळाडूंना चाचणीकरीता पाठविण्याबाबत सूचना द्याव्यात. सर्व खेळाडूंनी चाचणीस्थळी येण्यापूर्वी https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26 या गुगल लिंकव्दारे नोंदणी पूर्ण केल्याची खात्री करावी. खेळाडूंना त्याचे मूळ आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्लब व शाळांच्या मुले व मुलींनी महादेवा प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणीत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडाधिकारी आत्माराम बोधीकर (9561760878) यांच्याशी व फुटबॉल संघटनेचे सचिव अजगर पटेल (9175767778) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment