08 October, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची दुय्यम निबंधक कार्यालयाला भेट

• नागरिकांच्या डाटा सुरक्षेसाठी नवीन प्रणालीबाबत सकारात्मक पाऊल हिंगोली (दि. 08 ऑक्टोबर) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला भेट देऊन कार्यालयाच्या कार्यपद्धती, नवीन प्रणालीची अंमलबजावणी तसेच नागरिकांच्या डाटा सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती घेतली. सातारा येथे पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या धर्तीवर जिल्ह्यात या पद्धतीने कामकाज करता येईल, याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी गुप्ता यांनी कार्यालयातील नोंदणी प्रक्रिया, डाटा संकलन व संदर्भ सूची सहज व सुलभरित्या उपलब्ध करण्याची पद्धत, तसेच सर्व प्रणाली परस्पर ऑनलाइन जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत बदलांबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या मालमत्ता नोंदणीशी संबंधित माहिती एकत्रित करताना ती सुरक्षित, अचूक आणि इतर शासकीय प्रणालींशी सुसंगत ठेवण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विशेषतः नोंदणी प्रक्रियेत मूल्यांकन कार्यालयाला वेगळा अर्ज न करता “सब-रजिस्ट्रेशन” (Sub-Registrar Registration) कसे पूर्ण होते याविषयी माहिती घेतली. या प्रक्रियेत गोळा होणारा नागरिकांचा डाटा ग्रामपंचायत, महसूल विभाग, मालमत्ता कर विभाग आदी इतर शासकीय यंत्रणांशी सुरक्षित पद्धतीने ऑनलाइन जोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींना ऑनलाइन प्रणालीशी जोडल्यामुळे स्थानिक पातळीवरील नोंदी तत्काळ उपलब्ध होतील, पारदर्शकता वाढेल तसेच नागरिकांना वेगवान सेवा मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी गुप्ता यांनी व्यक्त केला. डाटा एन्ट्री प्रक्रियेत सुधारणा व तांत्रिक अद्ययावततेद्वारे नागरिकांचा संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. या भेटीत संबंधित विभागाचे अधिकारी संजय सुंकवाड दुय्यम निबंधक व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सर्वांना समन्वयाने काम करून प्रणाली अधिक कार्यक्षम व पारदर्शक बनविण्याचे आवाहन केले. *****

No comments: