11 October, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची गुगळ पिंपरी शाळेला भेट

• विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे केले परीक्षण, शैक्षणिक कार्याबद्दल केले समाधान व्यक्त हिंगोली, दि. ११ (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुगळ पिंपरी (केंद्र कडोळी) येथे भेट देऊन शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पोहकर, आणि शिक्षक यु. जी. रणबावळे, एन. डी. बोरकर, डी. बी. लहाने, बी. टी. डांगे, भाऊराव शिंदे, किशोर हनवते, सुनिल अडबलवार आणि सचिन तायडे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव सुर्वे, सदस्य प्रफुल तायडे, पांडुरंग चोपडे, विष्णू तायडे, गणेश शिंदे, प्रवीण तायडे तसेच सरपंच नारायणराव खोडे यांनीही या भेटीत सहभाग घेतला. शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थीसंख्या २१८ आहे. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या, शैक्षणिक साधनसामग्री आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. त्यांनी मराठी, गणित व इंग्रजी या विषयांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली आणि इंग्रजी विषयावर विशेष भर देण्याचे शिक्षकांना सुचविले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि नियमित अध्ययनाचे महत्त्व पटवून दिले. एकूणच शाळेचे वातावरण, शिक्षकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले. *****

No comments: