16 October, 2025

दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय प्रतिबंधक समितीमार्फत धडक मोहीम

हिंगोली (जिमाका), दि. 16 : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या संभाव्य भेसळीच्या अनुषंगाने धडक मोहीम राबवून समितीमार्फत जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाची जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी करण्यात यावी व भेसळ आढळून आल्यास कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थातील होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय गठीत समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या दालनात नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीस सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी शिवाजी गिनगिने, अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. खताळ, डॉ. आर. ए. कल्ल्यापुरे, वैधमापन विभागाचे सहायक निरीक्षक एम. बी. धाबे उपस्थित होते. दीपावली सणानिमित्त मिठाई, खवा, पनीर, मैदा, हळद पावडर, खाद्यतेल अशा प्रकारच्या अन्नपदार्थाची खरेदी करताना काळजी घ्यावी. मिठाई शक्यतो ताजी असल्याची खात्री करुन आवश्यकतेनुसार घ्यावी. मिठाई सेवन शक्यतो 24 तासाच्या आत करावे. मिठाई परवानाधारक, नोंदणीधारकाकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या अन्नपदार्थाचे पक्के बील घ्यावे. पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे. यानंतरही अन्नपदार्थ मिठाई खरेदी करताना शंका आल्यास तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तसे जिल्हा समितीच्या निदर्शनास आणून द्यावेत. यासाठी टोल फ्री क्रमांक 9923689168 / 9049518711 यावर आपली तक्रार नोंदविण्यात यावी अथवा जिल्हा ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीमार्फत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments: