30 October, 2025

दिव्यांगाना दुर्धर आजारावरील उपचारासाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगाना दुर्धर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य या योजनेकरिता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, हिंगोली यांच्याकडे पंचायत समिती मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व ज्यांच्याकडे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांगांना त्यांच्या आजारावरील उपचारासाठी 25 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर आजारामध्ये कॅन्सर, मेंदुविकार, क्षयरोग, हृदय शस्रक्रिया, किडनी, यकृत आजार, कुष्ठरोग, अर्धांगवायु, थॅलासिमिया, सिकलसेल, अॅनामिया, डायबिटीस या आजारांचा समावेश आहे. या योजनेच्या लाभाकरिता वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र 40 टक्के, युडीआयडी कार्ड, (सन 2015 च्या नंतरचे दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र असणे अवश्यक), तज्ञ डॉक्टरांचे सन 2025-26 या वर्षात दुर्धर आजारावर उपचार सुरु असल्याचे व खर्चाचे प्रमाणपत्र, ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याचा दाखला, पुरावा, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, लाभार्थी हा शासकीय सेवेत नसल्याबाबतचे हमीपत्र, लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक पासबुक झेरॉक्स, यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समितीमार्फत दि. 15 नोव्हेंबर, 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. *******

No comments: