14 October, 2025

ज्वारी पिक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलवर शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. १४ (जिमाका): रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य-उपअभियान (श्रीअन्न) तसेच आरकेव्हीवाय महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येणार असून, केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी राज्य शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर शुक्रवार (दि. १७)पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२४ पूर्वी झालेली असावी. यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी झालेल्या गटांनी “विद्यमान शेतकरी गट” हा पर्याय निवडून विद्यमान युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करणे आवश्यक आहे. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा (उदा. आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इ.), एकाच कुटुंबातील फक्त एका व्यक्तीसच लाभ मिळेल. २५ पेक्षा जास्त शेतकरी असलेल्या गटाने एकाच गावातील २५ शेतकऱ्यांची निवड करावी. निवड प्रक्रिया “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर केली जाईल. गटातील सर्व शेतकऱ्यांची अँग्रीस्टँकवर नोंदणी आणि फार्मर आयडी क्रमांक असणे बंधनकारक आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनी या संधीचा लाभ घेऊन महा-डीबीटी पोर्टलवर तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *****

No comments: