14 October, 2025
अतिवृष्टी-पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचा दिलासा*
• सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य – नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करण्याचा निर्णय
हिंगोली, दि. १४(जिमाका) :
राज्य शासनाने सन २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दिलासा जाहीर केला आहे. या अंतर्गत दोन निर्णय घेतले गेले असून, खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य तसेच खरडून नापिक झालेल्या शेतजमिनी मनरेगा अंतर्गत पुन्हा लागवडीयोग्य करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.
सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य
अतिवृष्टी/पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने प्रति विहीर जास्तीत जास्त ३० हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य मंजूर केले आहे. प्रत्यक्ष दुरुस्ती खर्च कमी असल्यास त्या प्रमाणात सहाय्य दिले जाईल.
पात्र शेतकऱ्यांनी विहिरीची नोंद असलेला ७/१२ उतारा जोडून गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करावा. पात्र लाभार्थ्यांना अंदाजपत्रकीय खर्चाच्या ५० टक्के रक्कम (कमाल १५ हजार रुपये) आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारीमार्फत देण्यात येईल, तर उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर अदा केली जाईल.
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित विहिरींचे जिओ-टॅगिंग करण्यात येणार आहे.
खरडून नापीक झालेल्या शेतजमिनी लागवडीयोग्य करणे
अतिवृष्टी व पूरामुळे खरडून नापीक झालेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या (कमाल मर्यादा २ हेक्टर) जमिनी मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत दुरुस्त करून पुन्हा लागवडीयोग्य केल्या जाणार आहेत.
जॉबकार्ड धारक शेतकऱ्यांना या कामांचा लाभ मिळणार असून, प्रति हेक्टर कमाल रु. ३ लाख (२ हेक्टरसाठी कमाल ५ लाख रुपये) खर्च अनुज्ञेय असेल. मजुरी व साहित्य खर्चाचे प्रमाण ६०:४० ठेवण्यात आले आहे. या कामांची अंमलबजावणी व सनियंत्रण ग्रामपंचायतीमार्फत केले जाणार आहे.
अंमलबजावणीसाठी तातडीचे निर्देश
या दोन्ही योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी संबंधित जिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.
या निर्णयांमुळे अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून आगामी हंगामात सिंचन सुविधांद्वारे शेती पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment