12 October, 2025

कृषि विज्ञान केंद्रातर्फे शेतकरी मेळाव्यात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, कडधान्य आत्मनिर्भर मिशनच्या शुभारंभ कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबकास्टिंग

* शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन हिंगोली: भारतीय कृषि अनुसंधान परिषद, कृषी विज्ञान परिसर, पुसा, नवी दिल्ली येथून आयोजित प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, कडधान्य आत्मनिर्भर मिशनच्या शुभारंभ कार्यक्रमाचे तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेतकरी मेळाव्यात ऑनलाईन वेबकास्टिंग यशस्वीरित्या करण्यात आले. प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते देशातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या 'प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना' आणि 'कडधान्य आत्मनिर्भर मिशन' योजनांचा शुभारंभ या मुख्य कार्यक्रमात करण्यात आला. तसेच २१०० हून अधिक योजनांचे उद्घाटन तसेच देशातील १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी १ कोटीहून अधिक उलाढाल असणाऱ्या १,१०० पेक्षा जास्त कंपन्यांचे कार्य व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत प्रमाणित झालेल्या १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या कार्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकात केंद्र सरकार देशात कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने कार्यरत आहे, यावर सविस्तर माहिती दिली. पिकांच्या व्यवस्थापनावर तांत्रिक सत्र या शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून पिकांच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये अनिल ओळंबे (उद्यान विद्या) यांनी हळदीचे सद्यस्थितीतील व्यवस्थापन, अजयकुमार सुगावे (पिक संरक्षण) यांनी हरभरा पिकाचे भविष्यकालीन व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि हळद व कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, साईनाथ खरात (मृदा विज्ञान) यांनी हळद पिकामध्ये सूक्ष्म मूलद्रव्यांचे व्यवस्थापन, तालुका कृषि अधिकारी के. एम. जाधव यांनी विविध सरकारी योजना व 'ॲग्री स्टॉक ॲप' विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राचे सर्व विषय विशेषज्ञ आणि कर्मचारी राजेश भालेराव, अनिल ओळंबे, अजय कुमार सुगावे, रोहिणी शिंदे, डॉ. अतुल मुराई, साईनाथ खरात, डॉ. कैलास गीते, विजय ठाकरे, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारोती कदम, संतोष हाणवते, प्रेमदास जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल मुराई यांनी केले, तर अनिल ओळंबे यांनी उपस्थितांचे आभार मानले. *******

No comments: