15 October, 2025
दिव्यांगाप्रती संवेदनशील राहून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
* अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जनजागृती कार्यशाळेचे आयोजन
हिंगोली, दि. 15 (जिमाका) : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये शासन दिव्यांगासाठी धोरण आणणार आहे. जिल्ह्यात अपंग पुनवर्सन केंद्र कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यात प्रत्येक दिव्यांगाचा सर्वे करण्यात येणार आहे. त्यामध्ये 22 ते 23 प्रकारच्या दिव्यांगाचा शोध घेण्यात येणार असून, या सर्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचून त्यांच्याप्रती संवेदनशील राहून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे, एसआरपीएफचे समादेशक श्री. दामणवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य विष्णू धबडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, *इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड*, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गिता गुठ्ठे आदी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये शासन दिव्यांगासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगांना ऑनलाईन तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासनामार्फत दिव्यांग फ्रेंडली पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या सूचना जिल्हा प्रशासनाला पाठवता येतील. आपल्या सूचना शासनाकडे पाठवून दिव्यांगाना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. दिव्यांग व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने कार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी सांगितले.
दिव्यांगाप्रती सौहार्दपूर्ण वागणूक ठेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात आणि दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी त्यांना इतरांप्रमाणे समान संधी देऊन शासनाच्या विविध योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा, असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ॲड. विष्णू धबडे यांनी दिव्यांगाचे हक्क, कर्तव्य आणि अधिकार यांची माहिती देऊन दिव्यांग व्यक्तींना मूलभूत शिक्षणाबरोबर संगणक शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच यावेळी ॲड. विनोदकुमार दायमा, ॲड. एन.एम. मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनीही या कार्यशाळेत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांविषयी, त्यांच्याशी वर्तणुकीतील संवेदनशीलता, तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्याबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गिता गुठ्ठे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, हिलन केलर, लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आज ‘जागतिक पांढरी काठी दिन’ असल्याने एका अंध शिक्षकाला पांढरी काठी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक श्री. दाभाडे यांनी दिव्यांगाविषयी कविता सादर केली. श्री. पिंगळकर यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सुगम्य शासन आणि जबाबदारी याबाबतच्या माहितीचे वाचन केले.
या कार्यशाळेस विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आश्रमशाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment