10 October, 2025
छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी भूमी लोकअदालतीचे आयोजन
• नागरिकांनी सहभागी होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : भूमी अभिलेख विभागात उप अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व उपसंचालक भूमि अभिलेख यांच्यास्तरावर अर्धन्यायिक स्वरुपाचे कामकाज चालते. विविध टप्प्यावरील असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने या प्रकरणात संबंधितांना न्यायदानास विलंब होत आहे.
महसूल मंत्री व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांच्या परिपत्रकान्वये विविध टप्प्यावर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, दमडी महल, पंचायत समिती शेजारी, गणेश कॉलनी, छत्रपती संभाजीनगर-431001 येथे भूमी अभिलेख लोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे.
या भूमी अभिलेख लोकअदालतीच्या माध्यमातून जनतेला जलद गतीने न्याय मिळवून देणे तसेच एकंदरीत समाजामध्ये सलोखा आणि सामंजस्य निर्माण होऊन सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीसाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भूमी अभिलेख लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रलंबित असलेली अर्धन्यायिक स्वरुपाची प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्यासाठी तसेच संबंधित नागरिकांच्या वेळेची बचत होण्याच्यादृष्टीने भूमी अभिलेख विभागातील उपसंचालक, भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर प्रदेश, छत्रपती संभाजीनगर यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणात भूमी लोक अदालतीचे दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्व संबंधित पक्षकार, वादी, प्रतिवादी, अपीलदार, जाबदार, त्यांचे विधीज्ञ व नागरिकांनी उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांच्यास्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या अर्धन्यायिक प्रकरणात तडजोडीने निकाली काढण्यासाठी दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी आयोजित केलेल्या भूमी लोक अदालतीत उपस्थित राहून आपली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भूमी लोक अदालतीत अपिलामधील दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणेने अथवा वकीलामार्फत तडजोड करण्यासाठी या न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल करु शकतात.
प्रलंबित असलेली अर्धन्यायिक स्वरुपाची प्रकरणे भूमी लोक अदालतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निकाली काढण्यासाठी या भूमी लोक अदालतीमध्ये सहभागी व्हावेत, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर प्रदेशाचे उपसंचालक भूमी अभिलेख यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment