09 October, 2025

औंढा नागनाथ येथे ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 09: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्यावतीने ‘मिशन वात्सल्य’योजनेअंतर्गत औंढा नागनाथ येथील पंचायत समिती सभागृहामध्ये नुकतेच ग्राम बाल संरक्षण समित्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षक, पंचायत समिती कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, युनिसेफच्या प्रक्लप समन्वयक मोनाली दुर्वे, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ग्राम बाल संरक्षण समिती ही काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या गरजा व समस्या ओळखून बालकांना तात्काळ मदत करणारी एक प्रभावी अशी यंत्रणा आहे. त्यासाठी आजच्या प्रशिक्षणात ज्या महत्वपूर्ण कायद्यावर मार्गदर्शन मिळणार आहे ते काळजीपूर्वक समजून घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात त्याची अंमलबजावणी करावी, असे पंचायत समिती कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी श्री. पराडकर यांनी यावेळी सांगितले. बालविवाह ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे ही प्रथा मुळासकट नष्ट करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे पर्यवेक्षक श्रीमती. जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी तर सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी केले. या प्रशिक्षणात विविध विषयांवर संबंधित तज्ज्ञांनी पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिका, जबाबदाऱ्या व बाल संरक्षण यंत्रणेचे कार्य, ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, 'प्रतिपालकत्व योजना, अनाथ प्रमाणपत्र, बालगृह, निरीक्षणगृह या विषयीची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी दिली. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कायदेशीर बाबी आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबतची माहिती मोनाली धुर्वे यानी दिली. दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया व पोक्सो कायदा २०१२ याबाबतची माहिती बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी दिली. चाईल्ड हेल्पलाइन 1098 नंबर बाबत तात्काळ सेवा व फोन रिस्पॉन्स सिस्टीमची माहिती चाईल्ड हेल्पलाइन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी दिली. शेवटी आभार प्रदर्शन चाईल्ड हेल्पलाइनचे केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी केले. ******

No comments: