07 October, 2025
ग्रंथभेट योजनेत निवड झालेल्या यादीवर 15 ऑक्टोबरपर्यंत हरकती आमंत्रित
हिंगोली (जिमाका), दि. 7 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1388 ग्रंथांची यादी (मराठी 749, हिंदी 297, इंग्रजी 342) ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 15 ऑक्टोबरपर्यंत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूट दराने वितरीत करणे बंधनकारक आहे.
या ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सूचना, हरकती, आक्षेप असल्यास दि. 15 ऑक्टोबर, 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई- 400 001 यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ई-मेलवर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सूचना, हरकती, आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी आवाहन केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment