18 October, 2025
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे १७८ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता
• थेट खात्यावर 141 कोटी 15 लाख रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे १७८ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 82 हजार 498 शेतकऱ्यांच्या खात्यावर 141 कोटी 15 लाख 3 हजार 339 रुपये मदतीचे अनुदान जमा करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
जिल्ह्यात जून ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27 लाख 92 हजार 335 रुपयांची मदत मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी 2 लाख 33 हजार 4 शेतकऱ्यांना १७८ कोटी १० लाख ६४८४७ रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठीची माहिती संगणक प्रणालीवर भरुन डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 82 हजार 498 शेतकऱ्यांच्या खात्यावर 141 कोटी 15 लाख 3 हजार 339 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या 48 हजार 539 शेतकऱ्यांना 34 कोटी 89 लाख 3 हजार 861 रुपयाची मदत ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर लगेच वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील 33 हजार 49 शेतकऱ्यांना 26 कोटी 95 लाख 21 हजार 322, वसमत तालुक्यातील 43 हजार 915 शेतकऱ्यांना 28 कोटी 28 लाख 34 हजार 78 रुपये, हिंगोली तालुक्यातील 32 हजार 638 शेतकऱ्यांना 25 कोटी 96 लाख 19 हजार 142 रुपये, कळमनुरी तालुक्यातील 35 हजार 258 शेतकऱ्यांना 30 कोटी 77 लाख 56 हजार 916 आणि सेनगाव तालुक्यातील 37 हजार 638 शेतकऱ्यांना 29 कोटी 17 लाख 71 हजार 881 रुपयाची मदत त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रलंबित राहिलेले 34 कोटी 89 लाख रुपयाचे अनुदान दिवाळीपूर्वी जमा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. त्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment