31 December, 2025

घर-घर संविधान कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 31 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त हिंगोली शहरातील नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे घर-घर संविधान कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन आज उत्साहात पार पडले. या दोन्ही वसतिगृहांमधील विद्यार्थिनी, त्यांचे पालक व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष अधिकारी अमोल घुगे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एस. डी. घुगे उपस्थित होते. पालक प्रतिनिधी म्हणून रमेश सोनटक्के, विजय पडघणे, हरिभाऊ पोपळघट, राजू ससाने, विनोद कागणे, मोतीराम फड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अमोल घुगे व श्रीमती गीता गुठ्ठे यांनी घर-घर संविधान उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी वसतिगृहातील अभ्यासिकेचा पुरेपूर लाभ घेऊन सातत्याने अभ्यास करावा व आपल्या कुटुंबाचे व वसतिगृहाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. घर-घर संविधान अमृतमहोत्सव निमित्त वसतिगृहात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तद्नंतर सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रवेशित विद्यार्थिनींनी स्वागतगीत व देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा सुरुसे व कु. प्रिती मोरे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थिनी, त्यांचे पालक तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *****

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हिंगोली दौरा

हिंगोली (जिमाका), दि. 31 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या गुरुवार दि. 01 जानेवारी, 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 01 जानेवारी रोजी नागपूर येथून हेलिकॉप्टरने दुपारी 12.15 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान हेलिपॅड, हिंगोली येथे आगमन व मोटारीने बैठक स्थळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता गणेश इन हॉटेल येथे सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता मोटारीने श्रीमती प्रज्ञा सातव यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानाकडे प्रयाण. 2.30 वाजता श्रीमती सातव यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता मोटारीने संत नामदेव पोलीस कवायत मैदान हेलिपॅड हिंगोलीकडे प्रयाण. 3.20 वाजता हिंगोली हेलिपॅड येथे आगमन करुन हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळाकडे प्रस्थान करतील. ******

30 December, 2025

जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. ३० : जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. किरण लोंढे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, भाऊसाहेब पाईकराव, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अप्पासाहेब उगले, मंगेश गायकवाड तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बोधवड यांनी सर्व शासकीय कार्यालये स्वच्छ व नीटनेटकी ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कोटपा कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार २०० रुपये दंड आकारण्यात यावा आणि प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तंबाखू सेवनास मनाई असल्याबाबतचे निर्देश फलक लावण्यात यावेत, असे निर्देश दिले. आरोग्य व पोलिस विभागाने जिल्ह्यात नियमित धाडसत्र राबवावीत, शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी तसेच नगर परिषदांनी शैक्षणिक परिसरातील पानटपऱ्या हटविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. बोधवड यांनी संबंधित विभागांना दिल्या. तद्नंतर उपस्थित मान्यवरांना तंबाखू विरोधी कायदा कोटपा–२००३ बाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. ******

भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 30 :जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून भूगर्भातून आवाज येत असल्याचे निदर्शनास आले आहे. आज मंगळवार (दि. 30) रोजी सकाळी 5.55 वाजता पुन्हा एकदा सौम्य धक्का व भूगर्भीय आवाज जाणवला असून याची नोंद भारतीय हवामान विभागाच्या भूकंप मापक केंद्रात 3.5 रिक्टर स्केल इतकी करण्यात आली आहे. सन 1993 मध्ये किल्लारी (लातूर) येथे झालेल्या भूकंपात घरांच्या पत्र्याच्या छतांवर ठेवलेल्या दगडांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती, याची दखल घेता खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांतील नागरिकांनी विशेषतः ज्यांच्या घरांची छते पत्र्याची असून त्यावर दगड ठेवलेले आहेत, अशा नागरिकांनी हे दगड तात्काळ काढून घ्यावेत तसेच पत्र्याला तारेच्या सहाय्याने योग्य आधार द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. भूकंप आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूकंपापूर्वी इमारतींचे बांधकाम भूकंपरोधक निकषांनुसार असावे. घराच्या छताला अथवा पायाला भेगा असल्यास त्वरित दुरुस्ती करावी. पाण्याची बाटली, कोरडे अन्नपदार्थ, प्रथमोपचार साहित्य, बॅटरी, मेणबत्ती, आगपेटी, चाकू, पाणी शुद्धीकरणाची साधने, जीवनावश्यक औषधे, रोख रक्कम, रेडिओ, शिट्टी इत्यादी वस्तू सहज वाहून नेता येतील अशा पिशवीत नेहमी तयार ठेवाव्यात. घरातील फळ्या, कपाटे भिंतीला घट्ट बसवावीत व जड वस्तू खालच्या बाजूस ठेवाव्यात. काचेच्या व फुटणाऱ्या वस्तू बंद कपाटात ठेवाव्यात. गॅस, वीज व पाण्याच्या जोडण्या सुरक्षितपणे जखडून ठेवाव्यात. भूकंपादरम्यान इमारतीत असाल तर शक्य असल्यास मोकळ्या जागेकडे जावे अथवा टेबलाखाली, मजबूत खांबाजवळ, दरवाजाच्या चौकटीत आसरा घ्यावा. लिफ्टचा वापर करू नये. रस्त्यावर असाल तर उंच इमारती, भिंती व विजेच्या तारांपासून दूर मोकळ्या जागेत थांबावे. वाहन चालवत असाल तर सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवावे. भूकंपानंतर रेडिओ किंवा टी.व्ही.वरून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पाणी, गॅस व वीज कनेक्शन बंद ठेवावेत. धूम्रपान टाळावे. विजेच्या तारा हाताळू नयेत. नुकसान झालेल्या इमारतींचा वापर करू नये तसेच रस्ते मोकळे ठेवून मदत कार्यासाठी सहकार्य करावे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी केले आहे. *******

पालक सचिव रिचा बागला यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा आढावा

• सर्वसमावेशक विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यासाठी परवानगी घेण्याच्या सूचना हिंगोली (जिमाका), दि. 30 : महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला यांनी आज ऑनलाईन बैठकीत सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, नगर विकास विभागाचे सह आयुक्त आश्विनकुमार माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. औंढा नागनाथ परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, भक्त निवास, स्वच्छता, सौंदर्यीकरण, परिसर विकास व पर्यावरणपूरक विकास यांचा समावेश असलेल्या 221 कोटी 62 लाख रुपयांच्या विकास आराखड्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, तसेच धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन दृष्टिकोनातून या तीर्थक्षेत्राचा समतोल व नियोजनबद्ध विकास करून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ हे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे आकर्षण ठरावे, अशा सूचना पालक सचिव रिचा बागला यांनी दिल्या. तयार करण्यात आलेला विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी. तसेच आराखडा अंतिम करण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात पुन्हा ऑनलाईन बैठक आयोजित करावी, असे निर्देशही पालक सचिव श्रीमती बागला यांनी दिले. दरम्यान, श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या 221 कोटी 62 लाख रुपयांच्या विकास आराखड्याची तसेच भाविक व पर्यटकांना आदर्श सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे यावेळी दिली. ******

इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या पडताळणीची मुदत 12 महिनेच-वैध मापनशास्त्र विभागाचे स्पष्टीकरण

हिंगोली (जिमाका), दि. 30 : “व्यापारी बंधूसाठी महत्त्वाचे” या मथळ्याखाली प्रसारित झालेल्या एका प्रेसनोट /व्हाट्सअप मॅसेजमध्ये मोजमाप उपकरणांची पडताळणीची मुदत 24 महिन्यांसाठी एकसमान करण्यात आल्याचा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. मात्र, या संदर्भात व्यापा-यांमध्ये गैरसमज पसरत असल्याने वैध मापनशास्त्र विभागाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार वैध मापनशास्त्र (सामान्य) नियम, 2011 मधील नियम 27 (2) (क) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार 18 डिसेंबर 2025 पूर्वी सर्व वजने, धारिता मापे, लांबी मोजमापे, टेप, बीम स्केल व काउंटर मशिन यांची पडताळणी मुदत 24 महिने होती. 18 डिसेंबर 2025 नंतरच्या सुधारित नियमांमध्ये याच यादीत इंधन डिस्पेंसर (पेट्रोल व डिझेल) यांचाही समावेश करण्यात आला असून, त्यांचीही पडताळणी मुदत 24 महिने करण्यात आली आहे. मात्र, या अधिसूचनेनुसार 24 महिने वैधता असलेली उपकरणे ही केवळ यांत्रिक (मेकॅनिकल) स्वरूपाची असून त्यामध्ये वजने, धारिता मापे, लांबी मोजमापे (मीटरपट्टी), लांबी मोजण्याचे टेप, बीम स्केल (दांडीचा तराजू), काउंटर मशिन आणि त्यात नव्याने समाविष्ट केलेले इंधन डिस्पेंसर (पेट्रोल व डिझेल) यांचाच समावेश आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या पडताळणीची मुदतही 24 महिने झाली असा समज काही व्यापा-यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, वैध मापनशास्त्र विभागाच्या उपनियंत्रकांनी स्पष्ट केले आहे की इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या पडताळणीची मुदत ही 12 महिने (1 वर्ष) इतकीच असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैध मापनशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे. ******

29 December, 2025

अनुसूचित जाती व नवबौद्ध नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि.29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने सन 2015 मध्ये जाहीर केलेल्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी भरण्यास सहाय्य करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन एकूण प्रकल्प किमतीतील लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर व संबंधित बँकेने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येईल. या योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकांना देण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या नावे अनुदान मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत उद्योजक आधार नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र जोडणे बंधनकारक आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र नवउद्योजकांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. ******

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत एबीपी फेलो नियुक्ती व मानधनासाठी बाह्यस्त्रोत यंत्रणेची निवड करण्यासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : नीती आयोगाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमांतर्गत आकांक्षी तालुका कार्यक्रमातील सहकारी (एबीपी फेलो) यांच्या नियुक्ती व मानधन अदा करण्याकरिता बाह्यस्त्रोत यंत्रणेची नियुक्ती करण्यात येणार आहे. एबीपी फेलो या पदास ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून, संबंधित फेलोना प्रतिमाह 55 हजार रुपये इतके मानधन अनुज्ञेय राहणार आहे. या अनुषंगाने इच्छुक व पात्र पुरवठादार/संस्थांनी आपले दरपत्रक सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयास आजपासून 5 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. यासाठी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेचे मागील वर्षापर्यंतचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असावे. तसेच मानधनामधील कपातीबाबत स्वयंस्पष्ट दरपत्रक सादर करणे अनिवार्य राहील. या अटी व शर्तीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी सीलबंद लिफाफ्यात दरपत्रक सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी केले आहे. ******

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2025–26 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्याच्या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी दिनांक 01 जानेवारी 2026 पासून संबंधित कार्यालयाकडून विनामूल्य अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जासोबत बचत गट शासकीय कार्यालयाकडे नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवन्नोनती अभियान व्यवस्थापन कक्ष येथे ऑनलाईन नोंदणी केलेले प्रमाणपत्र व सर्व सदस्यांची नोंद असलेली यादी किंवा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), हिंगोली यांच्याकडून प्राप्त ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, बचत गटात किमान 10 सदस्य असणे आवश्यक, गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे व त्यांची जात प्रमाणपत्रे, बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे, बचत गटाचे पॅन कार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्डाची प्रत, तसेच यापूर्वी बचत गटाने किंवा गटातील कोणत्याही सदस्याने या योजनेचा लाभ घेतलेला नाही, असे शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेचा पात्र बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे. ******

अखंड हरिनाम सप्ताहात बालविवाह मुक्त भारत उपक्रमांतर्गत जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 29 : हिंगोली येथील आनंद नगर व चंद्रश्लोक नगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाच्या निमित्ताने बालविवाह मुक्त भारत या उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित भाविक भक्तांना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे हक्क तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान याबाबत त्यांनी उपस्थितांना जागरूक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांकडून बालविवाह न करण्याची व बालविवाहास प्रतिबंध करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. समाजातून बालविवाह हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमास चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, पर्यवेक्षक विकास लोणकर व राजरत्न पाईकराव उपस्थित होते. त्यांनी बालविवाह संदर्भातील तक्रार नोंदविण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098 या क्रमांकाची माहिती देत गरजूंना तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले. या कार्यक्रमामुळे भाविकांमध्ये बालविवाहाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होऊन बालविवाहमुक्त समाज घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. *****

बालविवाहमुक्त भारत उपक्रमांतर्गत पांडुरंग माध्यमिक विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम

हिंगोली (जिमाका), दि. 29: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात “बालविवाह मुक्त भारत” या उपक्रमांतर्गत हिंगोली तालुक्यातील समगा येथील पांडुरंग माध्यमिक विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडून बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, संबंधित कायदेशीर तरतुदी तसेच मुला-मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे समुपदेशक अंकुर पाटोडे व केसवर्कर सुरज इंगळे उपस्थित होते. त्यांनी बालविवाहासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकाची माहिती दिली तसेच गरजू बालकांना तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले. याप्रसंगी पांडुरंग माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. डी. नरवाडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद, महिला कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालहक्कांचे संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व व बालविवाहाविरुद्ध जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. ******

27 December, 2025

डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. २७ : डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सी. आर. गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. *******

26 December, 2025

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिंगोली जिल्ह्यात लिंगगुणोत्तरात वाढ

* जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न * गर्भलिंग निदान व अनधिकृत गर्भपाताबाबत संकेतस्थळावर व हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी हिंगोली (जिमाका), दि. २६ : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हा सल्लागार समिती, हिंगोलीची बैठक नुकतीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील लिंगगुणोत्तर बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सन २०२३ मध्ये लिंगगुणोत्तर प्रमाण १०००:८९७ इतके होते, ते सन २०२४ मध्ये १०००:९६१ इतके झाल्याने ६४ ने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. ही बाब समाधानकारक असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले. पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची त्रैमासिक तसेच अचानक तपासणी करणे, स्टिंग ऑपरेशन व डी-कॉय केसेस राबविणे याबाबत सर्व समुचित प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच अनधिकृत गर्भपात रोखण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. गर्भलिंग निदान होऊ नये यासाठी सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करणे, बक्षीस योजनांबाबत माहिती देणे तसेच तक्रार नोंदविण्यासाठी वेबसाईट व हेल्पलाईन क्रमांकाची प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी जिल्ह्यात विविध कारवाया करण्यात आलेल्या असून सध्या न्यायालयात ०३ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. समुचित प्राधिकाऱ्यांमार्फत त्रैमासिक व धडक मोहिमांद्वारे तपासण्या केल्या जात असून सार्वजनिक ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. मुलींचे समाजातील महत्त्व पटवून देण्यासाठी समुपदेशन करण्यात येते. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे स्त्री जन्माचे स्वागत प्रसूती मातेस साडी-चोळी देऊन करण्यात येते, अशी माहिती अॅड. सुकेशिनी ढवळे यांनी समितीसमोर सादर केली. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन हिंगोली जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर अधिक सुधारण्यासाठी नागरिकांनी गर्भलिंग निदान व अनधिकृत गर्भपाताबाबत www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तसेच १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. *******

हिंगोलीत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा; विविध स्पर्धांतून बालकांच्या शौर्याला अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 26: भारताच्या गौरवशाली इतिहासातील वीर बालकांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त हिंगोली येथील श्री स्वामी समर्थ बालगृह (खानापूर चित्ता) तसेच सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह (सावरकर नगर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान जिल्हा महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व मान्यवरांनी बालकांशी संवाद साधून वीर बालकांचा शौर्याचा वारसा, त्यांचा त्याग व उदात्त मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून मुला-मुलींना वीर बालकांचे ऐतिहासिक महत्त्व व त्यांचे बलिदान समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे बालकांमध्ये देशभक्ती, नैतिक मूल्ये व आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली. बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कॅरम, लगोरी यांसारख्या क्रीडा स्पर्धांमधून बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य पी. आर. हेंबाडे, संगीता दुबे, किरण कर्डेकर तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे व केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनीही बालकांशी संवाद साधला. मान्यवरांनी वीर बालकांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धैर्य, प्रामाणिकपणा व आत्मसन्मान जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती मुलींचे निरीक्षण व बालगृहाचे अधीक्षक शंकर घ्यार तसेच श्री स्वामी समर्थ बालगृहाचे अधीक्षक रमेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. ******

हिंगोली जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी 2 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि.26 : हिंगोली जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी रिक्त असलेल्या ठिकाणाकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतींसह अर्ज दिनांक 2 जानेवारी 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. अर्जाचा नमुना, संपूर्ण जाहिरात, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया, अटी व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती https://hingoli.nic.in/en/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदारांनी वेळोवेळी वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे. या संदर्भात कोणतेही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नाहीत तसेच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे. *******

हक्क न सांगितलेल्या मालमत्तेच्या निपटाऱ्यासाठी 29 डिसेंबर रोजी विशेष शिबिर

हिंगोली (जिमाका), दि.26 : वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हा अग्रणी बँकेमार्फत हक्क न सांगितलेल्या मालमत्तेच्या निपटाऱ्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन सोमवार, दि. 29 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली येथे होणार आहे. राज्यभरात हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही हे शिबिर होत आहे. विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये दीर्घकाळापासून निष्क्रिय किंवा अनाकलनीय असलेल्या ठेव, शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आदी मालमत्तांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे व योग्य हक्कदारांना त्यांची मालमत्ता मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरात नागरिकांना विविध बँकांमधील निष्क्रिय अथवा अनाकलनीय खात्यांची माहिती व पडताळणी, दावा सादर करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, संबंधित बँकांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी थेट संवादाची संधी तसेच ऑनलाईन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यासाठी मदत दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आर्थिक हक्कांबाबत जागरूकता निर्माण होऊन निष्क्रिय मालमत्ता योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. शिबिरात बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच इतर संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी शिबिराला उपस्थित राहून स्वतःची किंवा कुटुंबातील सदस्यांची अनाकलनीय ठेव व मालमत्ता तपासून आपल्या हक्काचा दावा सादर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे. वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हा अग्रणी बँकेमार्फत 29 डिसेंबर रोजी हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा शिबिर घेतले जाणार आहे. *******

जिल्हाधिकारी कार्यालयात वीर बाल दिवस साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 26 : शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना वीर बाल दिनी त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. **

ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

हिंगोली, दि. 26 (जिमाका) : शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आरोग्याविषयी अचूक माहिती मिळावी तसेच खतांचा समतोल व योग्य वापर करता यावा, या उद्देशाने ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यालयातील आत्मा सभागृहात विशेष प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, नेक्स्ट जेन ऍग्रो कंपनीचे निलेश राऊत तसेच तंत्रसहाय्यक राजेश मुलगीर, संदीप कावडे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात निवड झालेल्या 15 कंपन्या व वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आज शुक्रवार (दि. 26) रोजी हे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मृद नमुना संकलनाची योग्य पद्धत, प्रयोगशाळेची रचना व आवश्यक उपकरणे, मृद परीक्षण प्रक्रिया तसेच अहवाल तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन तांत्रिक तज्ञ निखिल शिरोळे यांनी केले. प्रशिक्षणामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळून ग्राम पातळीवर मृद चाचणी सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन स्मार्टचे नोडल अधिकारी तथा आत्माचे उपप्रकल्प संचालक गोविंद बंटेवाड यांनी केले. या कार्यक्रमास निवड झालेले लाभार्थी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शाश्वत शेतीला चालना मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ******

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 31 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर हिंगोली व शककर्ता शालिवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी औंढा नागनाथ येथील शककर्ता शालिवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात क्वेस कॉर्प पुणे, धुत ट्रान्समिशन प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर, स्काय प्लेसमेंट प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर, ओमसाई मॅनपावर सर्व्हिस प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर, संकल्प जॉब प्लेसमेंट प्रा. लि. हिंगोली, बंसल क्लासेस हिंगोली, स्वमान फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर, भारत फायनान्स हिंगोली, स्वतंत्र मायक्रो फायनान्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, राजयोग मेडीमार्ट हिंगोली, युवा परिवर्तन मुंबई, चैतन्या इंडिया फिन क्रेडिट प्रा. लि. हिंगोली यासह महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सहभाग घेणार आहेत. तसेच जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉलही या रोजगार मेळाव्यात लावण्यात येणार आहेत. या मेळाव्यासाठी दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदवीधर उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार 300 हून अधिक रिक्त पदे उपलब्ध असून ती www.rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळांवर अधिसूचित करण्यात आली आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून खाजगी क्षेत्रातील नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने शककर्ता शालिवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ येथे उपस्थित रहावे. रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय, हिंगोली येथे दूरध्वनी क्रमांक 02456-224574 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे. ******

25 December, 2025

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. २५ : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. *******

24 December, 2025

एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल प्रवेशासाठी 1 मार्च रोजी प्रवेश परीक्षा

हिंगोली (जिमाका), दि. 24: इंग्रजी माध्यमांच्या एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 1 मार्च 2026 रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली अंतर्गत ही प्रवेश परीक्षा शासकीय आश्रम शाळा, जामगव्हाण, ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथे होणार आहे. इयत्ता 6 वीकरिता प्रवेश परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत, तर इयत्ता 7 वी ते 9 वीकरिता सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कळमनुरी प्रकल्प कार्यालय तसेच या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच सर्व शासनमान्य प्राथमिक व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे किंवा प्रकल्प कार्यालय, कळमनुरी येथे दिनांक 30 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे. ***

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदांच्या मुलाखतीस अनुपस्थित उमेदवारांना 30 डिसेंबर रोजी एक संधी

हिंगोली (जिमाका), दि. 24 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2025 दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार अनुपस्थित राहिल्याने अशा अनुपस्थित उमेदवारांना एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली यांच्या दालनात मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हास्तरीय पदभरती समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी स्पष्ट केले आहे. ***

पारधी विकास योजना अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 24: पारधी विकास योजना सन 2025-26 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांना जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार पारधी जमातीचे युवक-युवती, महिला, पुरुष व शेतकरी लाभार्थ्यांकडून मंजूर योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली यांच्या नावे दिनांक 24 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत प्रकल्प कार्यालय, कळमनुरी येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. तसेच ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थांकडूनही याच कालावधीत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. विहित मुदतीनंतर किंवा अपूर्ण कागदपत्रांसह सादर झालेल्या अर्जांचा अथवा प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. पारधी विकास योजना 2025-26 अंतर्गत (1) पारधी जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांना तीन चाकी/चार चाकी मालवाहू अथवा प्रवासी ऑटो खरेदीसाठी अर्थसहाय्य, (2) पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना शेळी गट पुरवठा, (3) पारधी वस्ती/बेड्यावर बालसंस्कार केंद्र चालविणे, (4) पारधी वाड्यावर जाऊन नाटक सादरीकरणाद्वारे जनजागृती व अंधश्रद्धा निर्मूलन प्रयोग सादर करणे, (5) पारधी समाजासाठी एकदिवसीय कायदेविषयक शिबिर घेऊन संविधान व कायदेविषयक पुस्तकांचे वाटप करणे, (6) पारधी समाजाच्या वस्ती/बेड्यावर सोलार स्ट्रीट हायमास्ट एलईडी लाईट बसविणे या योजना राबविण्यात येणार आहेत. योजना क्रमांक 1 व 2 साठी हिंगोली जिल्ह्यातील पारधी जमातीचे लाभार्थी केवळ एका योजनेसाठीच अर्ज करू शकतील. यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी अर्ज केल्यास ते रद्द करण्यात येतील. तसेच अपूर्ण भरलेले अर्जही रद्द करण्यात येणार आहेत. योजना क्रमांक 3, 4 व 5 साठी पारधी वस्ती/बेड्यावर काम करणाऱ्या नोंदणीकृत सेवाभावी संस्थांकडून दिनांक 24 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्तावासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, किमान तीन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल, सभासदांची यादी, भौतिक सोयी-सुविधांची माहिती, पॅन कार्ड, बँक तपशील, व्यवसायकर भरण्याचा पुरावा, राष्ट्रीयकृत बँकेचे पाच लाख रुपयांचे सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र तसेच शासनाची मान्यता असल्यास त्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. उपलब्ध आर्थिक तरतूद व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांच्या अधीन राहून योजना राबविणे, रद्द करणे अथवा बदल करण्याचे तसेच प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली यांच्याकडे राखीव आहेत, असे प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ***

महाज्योतीमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी 2025-27 पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत 34 विद्यार्थ्यांना टॅब वाटप

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील निवड झालेल्या 34 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांच्यासह महाज्योती कार्यालयाकडून टॅब वाटपासाठी निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाज्योतीमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या 34 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना टॅबचा शैक्षणिक वापर कसा करावा, ऑनलाईन अध्ययन, अभ्यासक्रम व परीक्षेच्या तयारीसाठी टॅबचा प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किशोर महाजन, निरीक्षक मनिष राजुलवार, बालाजी टेंभुर्णे, वरिष्ठ लिपिक भास्कर वाकळे, ग्रंथपाल बाळु पवार, श्रीमती श्रध्दा तडकसे, जयदीप देशपांडे, प्रतिक सरनाईक, श्रीमती दिपाली सोनकांबळे, श्रीमती उखा मुरकुटे, श्रीमती विना कोकणी, प्रफुल चवरे, सचिन टाले, मारोती इंगळे, निरज राठोड, विश्वनाथ खोकले, संतोष गलांडे यांनी परिश्रम घेतले. **

23 December, 2025

राष्ट्रीय शेतकरी दिवस व ‘जी राम जी’ अधिनियमाबाबत तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात जनजागृती कार्यक्रम संपन्न

हिंगोली (जिमाका), दि.23 : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), तोंडापूर येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस तसेच ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविकेसाठी हमी मिशन (ग्रामीण) 2025’ (VB-GRAM G) अर्थात ‘जी राम जी’ अधिनियमाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी आणि सचिव डॉ. दिवेश चतुर्वेदी यांनी वेबकास्टिंगद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे उपस्थित शेतकरी व नागरिकांसाठी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पाचवे पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर समृद्ध ग्रामीण भारतासाठी ‘जी राम जी’ अधिनियमाचे महत्त्व विशद केले. या अधिनियमान्वये ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांची रोजगार हमी, शेतीच्या पीक हंगामात मजुरांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 60 दिवसांची विशेष तरतूद तसेच पारदर्शक अंमलबजावणीची प्रक्रिया याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये बबन ढोबळे, प्रभाकर मगर, महादेव अकमर यांच्यासह इतर 14 शेतकऱ्यांचा समावेश होता. कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना ‘जी राम जी’ अधिनियमांतर्गत बेरोजगारी भत्ता, केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के निधी हिस्सा, तसेच मजुरी दरांबाबत सविस्तर तांत्रिक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विषय विशेषज्ञ राजेश भालेराव, अनिल ओळंबे, अजय कुमार सुगावे, डॉ. अतुल मो. मुराई, श्री. साईनाथ खरात, डॉ. कैलास गीते तसेच कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. कैलास गीते यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल मुराई यांनी केले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट प्रतिनिधी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य संस्थांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू), डायलेसिस युनिट यासह विविध विभागांना भेट देऊन रुग्णालयातील उपलब्ध सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णसेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व वेळेत मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी नव्याने बांधण्यात येत असलेल्या स्त्री रुग्णालयास भेट देऊन सुरू असलेल्या बांधकामाची सद्यस्थिती व प्रगतीचा आढावा घेतला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित इमारतीच्या कामाची पाहणी करून नियोजन व पुढील कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या पाहणीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. सचिन बोधगिरे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील सोयी-सुविधा, कामकाज व सेवा वितरणाचा आढावा घेतला. फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागांची पाहणी करून एनक्वास (NQAS) मानांकनाच्या अनुषंगाने कामकाजाची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, सेवा गुणवत्ता व रुग्णसेवेबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणखी काही नवीन उपकरणे व सुविधा आवश्यक असल्यास त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सोलार सिस्टीम, आरओ पाणी फिल्टर, डिलिव्हरी टेबल, रुग्णवाहिका शेड, पार्किंग शेड तसेच डिजिटल इमर्जन्सी ड्रग सुविधांसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दिल्या जात असलेल्या उत्तम आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली पतंगे, डॉ. गायकवाड तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. या पाहणीप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली पतंगे, डॉ. गायकवाड, शाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

भव्य कर्णबधीर तपासणी, श्रवणयंत्र वाटप व उपचार शिबीर संपन्न

हिंगोली (जिमाका), दि.23 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातील कर्णबधीर आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी भव्य तपासणी, श्रवणयंत्र वाटप व उपचार शिबीराचे आयोजन आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले होते. या शिबीराचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबीरात जिल्ह्यातील एकूण 125 कर्णबधीर आजाराच्या संदर्भित विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कर्णबधीर तपासणीसाठी कर्ण हॉस्पिटल, कोल्हापूर येथील तज्ज्ञ डॉ. संदेश बागडी (एम.एस. ईएनटी सर्जन), डॉ. मोहन कुलकर्णी तसेच श्री. काळे (ऑडिओमेट्रिशियन) यांच्या चमूने विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. शिबीरात उपस्थित विशेषतज्ज्ञांचे स्वागत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ वर्ग-१ डॉ. गोपाल कदम, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन बोधगिरे, भूलतज्ज्ञ डॉ. नितीन पुरोहित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबीरात जिल्ह्यातील 75 कर्णबधीर विद्यार्थ्यांची बहिरेपणाची तपासणी करून 90 श्रवणयंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच गंभीर कर्णबधिरतेच्या उपचारासाठी व कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी काही विद्यार्थ्यांना कर्ण हॉस्पिटल, कोल्हापूर येथे संदर्भित करण्यात आले. या शस्त्रक्रियांमध्ये लहान मुलांच्या कर्णबधिरतेवरील अत्याधुनिक उपचारांचा समावेश आहे. शिबिरात सर्व तपासणी व औषधोपचार पूर्णतः मोफत करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. नांदूरकर, डीईआयसी मॅनेजर, लक्ष्मण गाभणे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक), ज्ञानोबा चव्हाण (सांख्यिकी अन्वेषक), प्रशांत गिरी (एफएलसी) तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील सर्व वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, ए.एन.एम. व रुग्णालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कर्णबधीर शिबिराच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील गरजू विद्यार्थी व बालकांनी श्रवणयंत्र, उपचार व शस्त्रक्रियेसाठी तालुकानिहाय आरबीएसके वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या बालकासाठी संपूर्ण मोफत कर्णबधिर उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. ***

हिंगोलीतील स्मार्ट प्रकल्पाला जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन साधला संवाद

हिंगोली (जिमाका), दि.23 : जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना जागतिक पातळीवरील मान्यता मिळत असून, याच अनुषंगाने जागतिक बँकेच्या सल्लागार नवनी खरडे यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पाच्या विविध घटकांना भेट देऊन शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी श्री फाळेश्वर महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., फाळेगाव ता. जि. हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेल्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रास त्यांनी भेट दिली. या केंद्रामार्फत मंगळवारपर्यंत सुमारे 8 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून अंदाजे 3 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भात केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट हिंगोली कार्यालयातील नोडल अधिकारी गोविंद बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ज्ञ जी. एच. कच्छवे, अर्थशास्त्र तज्ज्ञ जितेश नालट, कंपनीचे संचालक मारोती वैद्य तसेच इतर संचालक उपस्थित होते. जागतिक बँकेच्या सल्लागार नवनी खरडे यांनी उपस्थित संचालकांना प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील संधी, बाजारपेठ विस्तार आणि मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी दत्तगुरु फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., कळमनुरी येथे भेट देऊन हळद काढणीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंतच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. यावेळी कंपनीचे संचालक गंगाधर रिंगारे यांनी कंपनीमार्फत आतापर्यंत सुमारे 50 हजार मेट्रिक टन हळदीची निर्यात करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच जागतिक बँकेच्या सल्लागारांनी हरिद्रा हळद संशोधन केंद्र, वसमत येथेही भेट देऊन संशोधन, प्रक्रिया व निर्यातवृद्धीसंदर्भात मार्गदर्शन केले. स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, बाजारपेठेशी थेट जोडणी आणि कृषी व्यवसायाचे सक्षमीकरण साध्य होत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. **

आकांक्षीत तालुकाअंतर्गत सर्व कामाची माहिती पोर्टलवर अपडेट करावी- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 23: निती आयोगाच्या निर्देशांकानुसार आकांक्षीत तालुका हिंगोलीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजित कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच करण्यात आलेल्या प्रत्येक कामाची माहिती वेळोवेळी संबंधित पोर्टलवर अद्ययावत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षीत हिंगोली तालुक्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निती आयोगाने दिलेल्या निर्देशांकानुसार सर्व संबंधित विभागांनी प्रत्येक महिन्याचे स्वाक्षरीयुक्त अहवाल दरमहा सादर करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांप्रमाणे सर्व आरोग्य उपकेंद्रे एनक्वास प्रमाणित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करावी व त्याबाबतची माहिती सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांसाठी मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात यावा. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करावी. तसेच आशा सेविकांमार्फत 30 वर्षांवरील नागरिकांचे स्क्रिनिंग करावे. स्क्रिनिंगनंतर नागरिकांची वर्गवारी करून त्यांचे समुपदेशन करावे. यासाठी एफएक्यू तयार करावेत व त्यानुसार सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा व एमपीडब्ल्यू यांना प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणासाठी वेळापत्रक व साहित्य तयार करावे. संबंधित नागरिकांचे आभा कार्ड व आयुष्मान भारत कार्ड काढून घेऊन एनएचएममार्फत त्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. शिक्षण विभागाने शिक्षकांचे प्रशिक्षण शालेय वेळेत न ठेवता शनिवार व रविवारी आयोजित करावे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘सुपर 50’ उपक्रम राबवावा. निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्ग घेऊन त्यांची गुणवत्ता सुधारावी. तसेच आकांक्षीत 200 विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. हिंगोली तालुक्याची आकांक्षीत तालुका म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व इतर सेवा, पायाभूत सुविधा तसेच सामाजिक विकास या सहा निर्देशांकांवर लक्ष केंद्रित करून कामकाज करावे. शाळेतील स्वच्छतागृहे, प्रधानमंत्री आवास योजना यासह विविध योजनांचा आढावा घेऊन निती आयोगाच्या निर्देशांकानुसार 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करून संबंधित डेटा निती आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करावा. यामुळे आकांक्षीत हिंगोली तालुक्याची रँकिंग सुधारण्यासाठी सर्वांनी प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. **

शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करावा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 23 : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना मिळावा यासाठी सर्व ऊसतोड कामगारांचा सर्वेक्षणाद्वारे सविस्तर व अद्ययावत डाटा संकलीत करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हा ऊसतोड कामगार समिती तसेच प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. ऊसतोड कामगारांची अचूक ओळख पटविण्यासाठी सुस्पष्ट सर्वेक्षण प्रश्नावली तयार करावी. आशा सेविकांमार्फत गावपातळीवर प्रत्यक्ष भेटी घेऊन सर्वेक्षण करण्यात यावे. यासाठी ऊसतोड कामगारांसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे. सर्व ऊसतोड कामगारांचा अद्ययावत डाटा तयार करून त्यांना ई-श्रम कार्ड तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. बैठकीत साखर कारखान्यांमार्फत ऊसतोड कामगारांची माहिती व नोंदणी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजना, महिला ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्या, गर्भवती महिला ऊसतोड कामगारांसाठी उपलब्ध सुविधा तसेच माता व बालकांच्या आरोग्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी पात्र प्रस्तावांना मान्यता जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्त प्रथम खबर अहवाल व दोषारोपपत्रावरील प्रस्तावांवर चर्चा करून पात्र प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटींची पूर्तता करून पुढील बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच सर्व संबंधित समिती सदस्य उपस्थित होते. ***

22 December, 2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 पेपर क्र. 2 ची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध

हिंगोली (जिमाका), दि. 22: शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टाईटी)-2025 चे आयोजन रविवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी)-2025 च्या पेपर क्रमांक 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 मधील प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांबाबत उमेदवारांना काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास, ते दिनांक 19 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत परिषदेकडे सादर करता येतील. संबंधित आक्षेपांचे निवेदन आवश्यक पुराव्यासह केवळ ऑनलाईन पद्धतीने https://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या “आक्षेप नोंदणी” या लिंकद्वारेच पाठवावे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन पद्धतीखेरीज लेखी, टपालाने अथवा ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विषयतज्ञांच्या अभिप्रायानुसार विचार करून अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार असून, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे. *****

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 22: जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मौजे जवळा खंदारबन येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरात जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे या व्याख्याते म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी बालविवाहाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी जिल्हास्तरावरील यंत्रणा, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच महिला व बाल कल्याण विभाग यांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घडवून बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात आली. महिला सबलीकरण व बालविवाह ही एक सामाजिक समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना श्रीमती. कोरडे यांनी महिलांची समाजातील भूमिका, त्यांचे अधिकार, महिला सबलीकरणाची गरज आणि अंतर्गत असमानतेवर मात करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सक्षम महिला घडल्यास समाज सक्षम होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यासोबतच बालविवाह, त्याची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. बालविवाह प्रतिबंधासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. बालकांसाठी तात्काळ मदत करणाऱ्या चाईल्ड हेल्पलाईन 1098 व पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती देण्याचे आवाहन चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी केले. माहिती देणाऱ्या व्यक्तीची गोपनीयता राखली जाते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, दत्तक विधान, अनाथ प्रमाणपत्र याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. भोईवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. श्रीकांत गावंडे महिला सहकार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.स्वाती पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी रावसाहेब कल्याणकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. समीक्षा कदम यांच्यासह प्राध्यापकवृंद, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणातील जप्त वाहनांचा जाहीर लिलाव

हिंगोली (जिमाका), दि. 22: स्टोन क्रशर खदानीमधून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या जंगम मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त वाहने सोडविण्याबाबत संबंधित कसूरदारांना वारंवार कळवूनही दंडाची रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली नाही. तसेच जप्त केलेली जंगम मालमत्ता सोडविण्यासाठी संबंधित मालक पुढे न आल्याने एकूण सहा खदानधारकांकडील जे.सी.बी., क्रशर मशीन व इतर वाहने जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येत आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांच्याकडील दि. 19 डिसेंबर 2025 च्या पत्रानुसार या जंगम मालमत्तेची लघुत्तम किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यानुसार अटी व शर्तींच्या अधीन राहून जाहीर लिलावाची नोटीस देण्यात आली आहे. या जंगम मालमत्तेचा जाहीर लिलाव दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत महसूल मंडळ बासंबा, भांडेगाव, डिग्रस कऱ्हाळे अंतर्गत असलेल्या स्टोन क्रशर खदानींच्या ठिकाणी बोली पद्धतीने होणार आहे. इच्छुकांनी लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, हिंगोली येथील गौण खनिज विभागात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व प्रती वाहन रुपये 10 हजार अनामत रक्कम सादर करणे बंधनकारक राहील. ज्या मालकांनी दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दंडात्मक रक्कम भरली असल्यास त्यांना बंधपत्रावर संबंधित वाहन ताब्यात देण्यात येईल. लिलावात उच्चतम बोली लागलेल्या वाहनांचा ताबा संपूर्ण रक्कम भरल्यानंतर देण्यात येणार असून, वाहन उचलण्याचा व नोंदणीसंबंधीचा सर्व खर्च लिलावधारकाने स्वतः करावयाचा आहे. लिलाव प्रक्रियेसंदर्भात सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी, हिंगोली व तहसीलदार, हिंगोली यांनी राखून ठेवले असून, आवश्यकतेनुसार अटी व शर्तींमध्ये बदल, लिलाव मंजूर अथवा रद्द करण्याचा अधिकारही प्रशासनाकडे राहणार आहे. वरील सर्व अटी व शर्ती मान्य असलेल्या व्यक्तींनाच लिलावात सहभागी होता येईल, असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. ******

21 December, 2025

मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट; शांततेत प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सकाळी हिंगोली नगर परिषदेसाठी होत असलेल्या कल्याण मंडप येथील मतमोजणी केंद्रास भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पाडण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, हिंगोली नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या नगर परिषदांची मतमोजणी होत असून, सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ******

20 December, 2025

वसमत येथील नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 20 : वसमत नगर परिषदेसाठी आज सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत येथील विविध मतदान केंद्रांना भेट देत निवडणूक प्रक्रियेची सविस्तर तपासणी केली. मतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मतदारांची ये-जा, सुयोग्य पद्धतीने केलेली रांग व्यवस्थापन आदींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मतदान शांततेत, सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी दिली. त्यांनी मतदारांनी निर्धास्तपणे मतदान करावे, असे आवाहनही केले. यावेळी त्यांच्यासोबत वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

19 December, 2025

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कलम 163 लागू

हिंगोली, दि.१९ (जिमाका) :हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद निहाय मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मतमोजणी केंद्र व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू केले असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी आदेश निर्गमित केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–2025 साठी दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषदांसाठी मतदान दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी पार पडले असून, सुरुवातीस दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, काही नगरपरिषद व नगरपंचायतीं संदर्भात न्यायालयीन अपील दाखल झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या आदेशानुसार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार आहे. या आदेशानुसार मतमोजणी केंद्रापासून 100 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालये, उमेदवारांचे मंडप, दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व स्मार्ट वॉचेस यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचारी वगळता पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित पक्षांच्या उमेदवारांची चिन्हे प्रदर्शित करण्यास तसेच वैध ओळखपत्रांशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे आदेश निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाहीत. हे आदेश दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्रपणे आदेश तामिल करणे शक्य नसल्याने भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला असल्याचे जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *******

नगर परिषद निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात कलम 163 लागू : मतदानकेंद्र परिसरात निर्बंधांचे आदेश

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–2025 साठी दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नगर परिषद निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात कलम 163 लागू करण्यात आले असून, मतदानकेंद्र परिसरात निर्बंधांचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदांसाठी मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आले होते. मात्र काही नगर परिषद व नगरपंचायती संदर्भात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांच्या आदेशानुसार सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आला असून, आदर्श आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे. त्यानुसार दिनांक 04 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत आचारसंहितेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तसेच हिंगोली व वसमत शहरातील स्थगित प्रभागांसाठी दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील मतदान केंद्रे व त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालये, उमेदवारांचे मंडप, दुकाने, मोबाईल व कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे व स्मार्ट वॉचेस, निवडणूक कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने, तसेच संबंधित पक्ष किंवा उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तींचा प्रवेश यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांन्वये स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–2025 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील संबंधित मतदान केंद्रे व त्यांच्या 200 मीटर परिसरात वरील सर्व बाबींवर प्रतिबंध राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेपासून दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीत अंमलात राहतील. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी सभा, बैठका किंवा प्रचार मोहीम राबविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीस वैयक्तिकरित्या आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे. *****

18 December, 2025

जिल्हा नियोजन कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

हिंगोली, दि. १८ (जिमाका) : अल्पसंख्याक समाजाच्या घटनात्मक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन कार्यालयात आज अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. त्या अनुषंगाने दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. अल्पसंख्यांक समाजाला त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी, यासाठी अल्पसंख्यांक विकास विभाग, जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत अल्पसंख्यांक दिन आज साजरा करण्यात आला. अल्पसंख्यांक व बहुसंख्यांक यांच्यात परस्पर सलोखा व सदभाव कायम ठेवणे महत्त्वाचे असून लोककल्याणकारी दृष्टिकोनातून सर्वांनी यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतात विविधतेत एकता आहे. राज्यघटनेतील कलम 29 व 30 अंतर्गत अल्पसंख्यांकांसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. यावेळी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे तसेच प्रदीप नळगीरकर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण, समान संधी आणि सर्वसमावेशक विकास या बाबी अधोरेखित केल्या. कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून सर्वांनी एकत्रितपणे समाजात समता, बंधुता व न्याय मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सहायक संशोधन अधिकारी अतिवीर करेवार, सूत्रसंचालन एस. एस. धारे यांनी तर आभार एम. एस. शेख यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५’चे विमोचन

हिंगोली (जिमाका), दि. १८ : जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत वर्ष २०२५ करिता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सर्व घटकनिहाय सांख्यिकी माहिती समाविष्ट असलेले “जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५” हे पुस्तक तयार करण्यात आले असून, या पुस्तकाचे विमोचन आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड, उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजूषा मुथा, प्रगती चौंडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत दरवर्षी हिंगोली जिल्ह्याचा समग्र आढावा सादर करणारे हे प्रकाशन प्रसिद्ध करण्यात येते. या प्रकाशनामध्ये जिल्ह्याची दृष्टीक्षेपात माहिती, निवडक निर्देशांक, जिल्हा उत्पन्न, कृषी, जलसंपदा, वने, उद्योग, सहकार, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, ऊर्जा, जिल्हा वार्षिक योजना तसेच विविध विकास योजनांबाबत सविस्तर सांख्यिकी तक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील कला व संस्कृती, यात्रा, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव, पर्यटन याविषयी विशेष माहिती देण्यात आली असून, नव्याने स्थापन झालेले हळद संशोधन केंद्र तसेच लिगो-इंडिया प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती या प्रकाशनामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हे प्रकाशन जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करताना शासनाच्या विविध विभागांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वांगीण व तपशीलवार आकडेवारी उपलब्ध करून देणारे ठरणार असून, संशोधक व विद्यार्थ्यांसाठीही ते उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सदर प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या www.mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “प्रकाशन” या शीर्षकाखाली पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, सहायक संशोधन अधिकारी ए. ए. करेवार तसेच सांख्यिकी सहायक निशा नवले उपस्थित होते. *****

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी घेतला हिंगोली जिल्ह्याचा आढावा

• महसूल विभागाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश हिंगोली, दि. १८ (जिमाका) : जिल्ह्यातील जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील फेरफार नोंदी, अतिरिक्त नोंदी तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महसूलविषयक प्रकरणे कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ निकाली काढावीत. शेतकरी व नागरिकांना महसूल कार्यालयांमुळे अनावश्यक त्रास होऊ नये, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या सविस्तर आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर यांची उपस्थिती होती. यावेळी विभागीय आयुक्तांनी ई-चावडी प्रणाली, गाव नमुने क्रमांक १ ते २१ अद्ययावत भरणे, डी-४ घोषणापत्रे पूर्ण करणे, अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतजमिनींच्या नोंदी अचूकपणे करण्याबाबत सूचना दिल्या. पाच गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या प्लॉट वगळण्याची प्रक्रिया, अतिक्रमण प्रकरणे, तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महावितरण कंपनीकडून दाखल प्रलंबित प्रस्ताव व संबंधित क्षेत्रांसाठी लागणाऱ्या जमिनी बाबत चर्चा करण्यात आली. ‘जिवंत सातबारा’ अभियानाची सद्यस्थिती, जिल्ह्यातील अकृषक सातबारा वेगळे करण्याची कार्यवाही, डिमार्केशनपूर्वी केजीपी करणे, तसेच ज्या सातबारामध्ये कृषी व अकृषक क्षेत्र एकत्र नोंदलेले आहे ते नियमानुसार एकत्र ठेवणे अथवा आवश्यकतेनुसार वेगळे करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही चूक राहू नये, यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. गौण खनिज विभागांतर्गत शासकीय वसुली, नियोजन व अंमलबजावणी, गौण खनिज स्वामित्व शुल्काची प्रभावी वसुली, तसेच जिल्ह्यातील ४३ वाळू घाटांच्या निविदा व लिलाव प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. लिगो संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अतिरिक्त जमिनीच्या मागणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी केलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात आला. याशिवाय गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, ‘पीएम किसान’ योजनेंतर्गत प्राप्त तक्रारीचे निराकरण, मोबाईलद्वारे सेवादूत सेवा, ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीची प्रगती, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम व ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्राप्त तक्रारींचे वेळेत निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले. जमीन-२, आस्थापना तसेच गौण खनिजांशी संबंधित सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पदभरती व पदोन्नतीची प्रकरणे निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यात येतील, असे स्पष्ट करतानाच विभागीय चौकशी प्रकरणे, जन्म-मृत्यू नोंदणी, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, सामूहिक वनहक्क दावे आदी नागरिकांशी थेट संबंधित प्रकरणे प्राधान्याने व तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर यांनी दिले. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे, प्रतीक्षा भुते, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जीवक कांबळे, शारदा दळवी यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. *******