01 October, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट

• रुग्णालयातील विभागनिहाय पाहणी करून दिल्या सूचना हिंगोली, दि. १ (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सर्व विभागांची विभागनिहाय पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आकस्मिक भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बाह्य रुग्ण विभाग, पुरुष व स्त्री रुग्ण विभाग, प्रसूती गृह, शस्त्रक्रिया गृह, एक्स-रे विभाग, आस्थापना व लेखा विभाग यांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये लेखा विभाग व आस्थापना विभाग वेगळे ठेवावेत, तसेच रुग्णालयातील रेकॉर्ड व रिपोर्टिंग व्यवस्थित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. आरबीएसके टीमचे सर्व अहवाल तपासण्यात आले. यावेळी टीमचे कर्मचारी गैरहजर असल्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच एन्क्वाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेऊन लाईन लिस्टनुसार काटेकोरपणे काम करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यानंतर रुग्णालयातील फार्मसी, क्षयरोग विभाग, आरबीएसके काउन्सेलर विभाग, एक्स-रे विभाग तसेच डायलिसिस विभाग यांची पाहणी केली. प्रत्येक विभाग स्वतंत्र व रुग्णांच्या प्रायव्हसीनुसार कार्यरत राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयातील ‘ई-औषधी’ प्रणाली व मागणी पत्रांचा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. या आकस्मिक भेटीमुळे रुग्णालयातील कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम होण्यास चालना मिळेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. ****

No comments: