01 October, 2025

दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी दुग्ध उत्पादक शेतकरी गट, सभासदांनाच मूरघास युनिट प्रकल्प द्यावा

• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा हिंगोली(जिमाका), दि. 01 : जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी गट, सभासदांनाच मूरघास उत्पादन युनिट प्रकल्प देण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अतुल वायसे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. कृषी समृध्दी योजनेतून जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी हवामान बदलास अनुकूल पीक पद्धती मॉडेल, बायोपचार उत्पादन युनिट, मूरघास उत्पादन युनिट, हळद मूल्यवृद्धीसाठी शीतगृह, जलतारा, जैवकुंपण, करवंद लागवड, केळी निर्यात प्रकल्प उभारण्याबाबत आढावा घेण्यात आला. वसमत व हिंगोली बाजार समितीमध्ये स्टोरेज तयार करावेत. पाच एकरवरील जमीन असलेल्या प्रत्येक तालुक्यातील एका लाभार्थ्यांला जलतारा प्रकल्प द्यावा. 'एक जिल्हा एक उत्पादन' याप्रमाणे निती आयोगाने दिलेल्या निर्देशांकानुसार हळदीसाठी शीतगृह प्रकल्प मंजूर करावा. जिल्ह्यात ग्रामस्तरावर मृद व चाचणीच्या 15 प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात तीन याप्रमाणे शेतकरी, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्याचा तात्काळ सर्वे करुन अहवाल द्यावा. ई-पीक पाहणीचाही अहवाल द्यावा. तसेच सन 2024-25 च्या प्रधानमंत्री पिक विम्याची रक्कम तात्काळ वाटप करण्यासाठी पोर्टलच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करुन वाटपाची कार्यवाही करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी, आधार सिडींग, लँड सिडींग, सेल्फ रजिस्ट्रेशन आदी कामे तातडीने करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चालू वर्षाचा प्रधानमंत्री पिकविमा योजना, प्रधानमंत्री फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, ॲग्रीस्टॅक नोंदणी, मृद नमुने तपासणी अहवाल, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तीक शेततळे आदी योजनांचा आढावा घेतला. ***

No comments: