01 October, 2025

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरनुकसानीचा आढावा

हिंगोली, दि. 1 (जिमाका) : राज्याचे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील आपत्तीस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच सर्व विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना पूरग्रस्त नागरिकांना सर्व आवश्यक सोयीसुविधामध्ये अन्न, निवारा, आरोग्यसेवा व मदत साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. पूरस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पूरग्रस्त नागरिकांना शासनामार्फत तात्काळ स्वरूपात 10 किलो गहू व तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या 72 तासांपासून जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतली असून शुक्रवारपासून हवामान अनुकूल झाले आहे. यामुळे जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगांना सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, केळी, हळद या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः हळदीच्या पिकांचे नुकसान तात्काळ लक्षात येत नसले तरी पुढील काही काळात मुळांमध्ये कुज निर्माण होण्याची शक्यता अधिक असल्याने प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. जिल्ह्याला 231 कोटी रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे. आतापर्यंत 48 हजार 715 शेतकऱ्यांची माहिती प्रणालीमध्ये अपलोड करण्यात आली आहे. त्यांना 37 कोटी रुपयाचे डीबीटीद्वारे वितरण करण्यात आले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंतच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. त्याचा अनुदान मागणीचा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांची नावे प्रलंबित असल्याचे लक्षात आल्याने पालकमंत्री झिरवाळ यांनी तहसीलदार, महसूल कर्मचारी आणि कृषी विभागाला ई-केवायसीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचेदेखील आवाहन त्यांनी केले. पुरामुळे बाधित झालेल्या दांडेगाव, कुरुंदा आणि कोठारी या गावांमध्ये पूरपाणी शिरल्याने प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे केले आहेत. पुरात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे. चौंडी बहिरोबा गावातील पूल वाहून गेला असून, त्या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी निधी उपलब्ध करून काम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शाळा, अंगणवाड्या, वर्ग खोल्या, स्मशानभूमी आणि सार्वजनिक ठिकाणांवर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. दांडेगावातील काही नागरिकांना पुराचे पाणी शिरल्यामुळे स्थलांतर करावे लागले होते. याबाबत प्रशासनाने वेळेत कार्यवाही करून जीवितहानी टाळली. वेलतुरा येथील घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सविस्तर माहिती दिली. पालकमंत्र्यांनी यानंतर शांतता समितीची समन्वय बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून कायदा व सुव्यवस्था राखाव्यात, अशी सूचना केल्या. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी नागरिकांना पुढील काळात गाफील न राहण्याचे आवाहन केले. “अनावश्यक धाडस करू नका, स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपत्तीजन्य परिस्थितीत सतर्क रहा,” असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करून बाधित नागरिकांना तातडीने मदत व पुनर्वसन दिले जावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. आगामी पावसाळी दिवसांचा विचार करून तयारी पूर्ण ठेवावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ******

No comments: