29 August, 2025
सोयाबीनवर पिवळा मोझॅक; * वेळीच व्यवस्थापन करण्याचा तज्ञांचा सल्ला
हिंगोली(जिमाका), दि. 29 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जिल्हा मासिक चर्चासत्रांतर्गत प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्यात सेनगाव तालुक्यात विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांच्या चमूने पुसेगाव, रिधोरा व सेनगाव शिवारातील सोयाबीन कापूस, तूर, हळद, केळी अशा विविध प्रक्षेत्रावर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञांच्या व अधिकाऱ्यांच्या चमूने पुसेगाव येथील सोयाबीन प्रक्षेत्रावर भेट दिली असता त्या ठिकाणी पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त सोयाबीनची झाडे दिसून आली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबंधित प्रादुर्भावग्रस्त झाडे निदर्शनास आणून हा रोग विषाणूजन्य आहे आणि तो पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत पसरतो. या रोगाला वेळीच ओळखून उपाययोजना नाही केल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात पसरून पूर्ण शेत प्रादुर्भावग्रस्त करतो व त्यामुळे झाडांना फुले, शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळेत नियोजन करणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
व्यवस्थापनासाठी पिवळा मोझॅक(केवडा) झालेली पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून टाकावीत. जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्लोनिकॅमीड 50 टक्के डब्ल्यूजी 80 ग्रॅम (4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6 टक्के झेडसी 50 मिली (2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा असिटामिप्रीड 25 टक्के + बाइफेन्थ्रीन 25 टक्के डब्ल्यूजी 100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49 टक्के + इमिडाक्लोप्रीड 19.81 टक्के ओडी 140 मिली (7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रती एकर या प्रमाणात करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रती एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत. तसेच फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी, असे आवाहन तज्ञांमार्फत करण्यात आले.
या चमूमध्ये विद्यापीठातर्फे विस्तार कृषि विद्यावेता डॉ. गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत हे तर कृषी विभागातर्फे उपसंचालक (कृषी) प्रसाद हजारे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे आणि शिवप्रसाद संगेकर हे सहभागी झाले होते.
***
मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून शासकीय वसतीगृह प्रवेश व शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत वसतीगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत शैक्षणिक सहाय्य दिले जाणार आहे. ही योजना विशेषत: इयत्ता 12 वी उत्तीर्ण करुन बिगर व्यवसायिक अथवा व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
इच्छूक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर दि. 18 सप्टेंबर, 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, हिंगोली येथे भेट द्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.
******
एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा
हिंगोली (जिमाका), दि. 29 : येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी यांची बैठक डापकू कार्यालयात पार पडली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाविषयी माहिती देऊन सर्व एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच विभागांनी मदत करून त्यांना सामाजिक लाभाच्या योजना, येणाऱ्या अडचणी व उपाययोजना व संबंधित योजना मिळवून देण्याची विनंती सर्वांना केली. तसेच एड्सचा 2017 चा कायद्याबद्दल माहिती दिली.
यावेळी वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुनील भुक्तार, समाज कल्याण कार्यालयाचे एच. बी. पोपळघट, महिला व बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, रामप्रसाद मुडे, श्रीमती अलका रणवीर, इरफान कुरैशी तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, श्रीमती टीना कुंदणानी व आशिष पाटील यांनी सहकार्य केले.
****
ग्रामीण मागासवर्गीय मुलामुलींना अर्थसहाय्यासाठी लाभार्थ्यांची प्रारुप यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीस्तरावरुन लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र-अपात्र झालेल्या अर्जाची प्रारुप यादी पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.
पात्र-अपात्र यादीबाबत काही सूचना व हरकती असल्यास लाभार्थींने 7 दिवसाच्या आत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अथवा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. विलंबाने आलेल्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे.
***
मागासवर्गीय विद्यार्थी लॅपटॉप लाभार्थ्यांची प्रारुप यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा परिषद हिंगोली यांच्यामार्फत सेस योजना सन 2025-26 अंतर्गत 20 टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीस्तरावरुन लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जाची छाननी करुन प्रारुप यादी पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.
पात्र-अपात्र यादीबाबत काही सूचना व हरकती असल्यास संबंधित लाभार्थीने 7 दिवसाच्या आत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अथवा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. विलंबाने आलेल्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे.
***
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेऊन यशस्वी करावा - निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड
• ‘श्रीगणेशा आरोग्याचा’उपक्रमातून जिल्ह्यात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी
• मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
हिंगोली (जिमाका), दि.29 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. हे अभियान जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेऊन यशस्वी करावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी आयोजित बैठकीत दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, डॉ. बालाजी भाकरे, डॉ.मोहसीन खान, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, गणेश मंडळाचे प्रतिनिधी कल्याणराव देशमुख, सचिन इंगळे, नागेश संगेकर, संतोष शेंडगे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश मंडळाचे सहकार्य घेऊन जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2025 या कालावधीत जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. या शिबिरामध्ये विविध तपासणीसह मुख्यमंत्री सहायता निधी व शासन आरोग्यविषयी राबवित असलेल्या विविध योजनेची जनजागृती करावी, अशा सूचना यावेळी श्री. बोधवड यांनी दिल्या.
यावेळी माहिती देताना डॉ. कोरडे म्हणाले, मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच धर्मादाय रुग्णालयांशी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात जवळपास 200 आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत. या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे. तसेच या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत असून, या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी केले आहे.
******
दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्तीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित
हिंगोली (जिमाका), दि.29 : परभणी डाक विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आता 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे.
गेल्या 2 वर्षांमध्ये परभणी डाक विभागामध्ये 11 विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पटकावलेली आहे. यावर्षीही दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना 2025-26 स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व शाळांनी सहभाग नोंदवून आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाची शिष्यवृत्ती पटकावण्याची संधी द्यावी, असे आवाहन डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक डाक अधीक्षक (मुख्यालय) पवन मोरे, कार्यालयीन सहायक श्रीपाद कुंभारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परभणी डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.
*****
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 20 मिमी पाऊस
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, कळमनुरी तालुक्यात सर्वात जास्त 47.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 7.4 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 7.7 (613.1), कळमनुरी 47.1 (776.5), वसमत 23.1 (721.1), औंढा नागनाथ 13.9 (734.4) आणि सेनगाव तालुक्यात 7.4 (643.1) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 29 ऑगस्ट, 2025 पर्यंत सरासरी 693.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 110.9 अशी आहे.
*****
28 August, 2025
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
मुंबई, दि.२८ : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता
शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत.
गणेशमंडळांकडून व्यापक जनजागृती
नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.
00000
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 10 मिमी पाऊस
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वसमत तालुक्यात सर्वात जास्त 18.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वात कमी 3.5 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 3.5 (606.5), कळमनुरी 12.1 (729.4), वसमत 18.3 (698), औंढा नागनाथ (720.5) आणि सेनगाव तालुक्यात 4.2 (635.7) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 28 ऑगस्ट, 2025 पर्यंत सरासरी 673.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 109.1 अशी आहे.
******
गणेशोत्सव काळात अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे – अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
हिंगोली, दि. २८ (जिमाका): गणेशोत्सव तसेच दिवाळीपर्यंत होणाऱ्या विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नागरिक व गणेश मंडळांना अन्नसुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळावेत, प्रसाद झाकून ठेवावा, शिळे अन्न वाटू नये, प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तींनी हातमोजे, मास्क, अॅप्रन वापरावा तसेच संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींनी प्रसाद हाताळू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसाद वाटपासाठी मंडळांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी मिठाई व अन्नपदार्थ खरेदी करताना ताजेपणा, परवाना/नोंदणीधारक दुकाने, बॅच नंबर, बेस्ट बिफोर व एक्सपायरी दिनांक तपासावेत. उघड्यावरचे अन्न व भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी टाळावी, तर खवा-माव्याची मिठाई २४ तासांच्या आतच सेवन करावी.
नागरिकांना कोणतीही शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन, परभणी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) श्री. अ.ए. चौधरी यांनी केले आहे.
26 August, 2025
निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• अनुकंपा नियुक्तीसाठी 29 ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन
• तक्रार निवारण प्रणालीवरील प्राप्त तक्रारीचा तातडीने निपटारा करावा-जिल्हाधिकारी
• महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करावा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे रमेश भडके यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव जीओ टॅगसह तात्काळ सादर करावेत. विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव वेळेत करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. दायित्वाचे प्रस्ताव आय-पास प्रणालीवर अपलोड करुन निधी मागणीसाठी तात्काळ सादर करावेत. इमारती व रस्त्याला युनिक आयडी देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी विविध विकास कामाचे जिओ टॅगसह प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
अनुकंपा नियुक्तीसाठी 29 ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन
अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रासह दि. 29 ऑगस्ट, 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहण्याबाबत संबंधित यंत्रणेने पत्राद्वारे सूचित करावे. उमेदवारांला पत्र वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास गुरुवारपर्यंत सादर करावा.
तक्रार निवारण प्रणालीवरील प्राप्त तक्रारीचा तातडीने निपटारा करावा-जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वसामान्य नागरिकांसाठी तक्रारी निवारण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या तक्रार निवारण प्रणालीवर प्राप्त तक्रारीचा निपटारा करण्यासाठी युजर आयडी, पासवर्ड व डॅशबोर्डची लिंक पाठविण्यात येणार आहे. सर्व विभाग प्रमुखांनी या प्रणालीवर प्राप्त तक्रारीचा तातडीने निपटारा करावा. याचा दरमहा आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करावा
महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, शिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरबीएसकेच्या जिल्हा समन्वयकाकडून आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी गरोदर माता व बालकांना देण्यात येणारे उपचार, लसीकरण, त्यांना वाटप केलेले कार्ड याची गावनिहाय माहिती तसेच जिल्ह्यातील महिलांची एकूण संख्या याची अद्यावत एक्सेलशीट तयार करुन महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करावा, अशा सूचना दिल्या.
***
कुटुंब आधारित स्कीम लिंकेज कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि.26 : प्रत्येक बालकासाठी एक प्रेमळ कुटुंब या कार्यक्रमावर आधारित पर्यायी संगोपनाबाबत जिल्हास्तरावर व संस्थास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी संगोपन प्रणाली बळकटीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, मिरॅकल फाऊंडेशन इंडिया आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब आधारित पर्यायी संगोपन हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील गरजू कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण कक्ष व मिरॅकल फाऊंडेशन इंडिया यांच्या समन्वयाने जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत बालगृहातील प्रवेशित बालकांच्या पालकांना माहिती होण्यासाठी एकदिवसीय स्कीम लिंकेज कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे नुकताच घेण्यात आला.
यावेळी स्कीम लिंकेज कार्यक्रमाचा उद्देशाबाबत माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर.दरपलवार यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले. तसेच मिरॅकल फाऊंडेशन इंडियाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी सोनाली तिवाटने यांनी स्कीम लिंकेज कार्यक्रमांतर्गत कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी संगोपन प्रणाली बळकटीकरणाची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर.दरपलवार तर प्रमुख पाहूणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) विजय बोराटे, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, मिरॅकल फाऊंडेशन इंडियाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी सोनाली तिवाटने, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या सर्व विभागाच्या प्रमुखांनी संबंधित विभागाच्या विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण तर आभार प्रदर्शन सोनाली तिवाटने यांनी केले. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ या तालुक्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधीक्षक शंकर घ्यार, श्री स्वामी समर्थ बालगृहाचे अधीक्षक रमेश पवार, चाईल्ड हेल्प लाईन (1098) चे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर तथागत इंगळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, बालगृहातील प्रवेशित बालकांचे पालक आदी उपस्थित होते.
***
प्लॅटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी
हिंगोली (जिमाका), दि.26 : नीती आयोगानुसार वेगाने वाढणाऱ्या भारतातील प्लॅटफॉर्म वर्कर्स यांना सामाजिक संरक्षण देण्याची गरज ओळखून सामाजिक सुरक्षा कवच वाढविण्यासाठी प्लॅटफॉर्म कामगारांची नोंदणी, नोंदीत कामगारांना ओळखपत्रे जारी करण्याबाबत तसेच त्यांना आयुष्मान भारत अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी दि.25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 या कालावधीत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सहकार्याने जिल्हा आणि उपजिल्हास्तरावरील शिबिरांद्वारे नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी आणि प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या समन्वयाने विशेष मोहिमेचा आणखी एक दौरा आयोजित करुन प्रत्येक जिल्हास्तरावर नोडल अधिकारी यांची नियुक्ती करून प्लॅटफॉर्म कामगारांना आवश्यक सामाजिक सुरक्षा लाभ मिळण्यासाठी आपल्या विभागातील प्लॅटफॉर्म वर्कर्सची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
***
शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत ई-पीक पाहणी पूर्ण करावी • पणन महासंघाचे आवाहन
हिंगोली(जिमाका), दि.26: केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हिंगोली जिल्ह्यात एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत हंगाम 2025-26 मध्ये कडधान्य व तेलबिया (मूग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी ई-पीक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे. तसेच ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.
***
25 August, 2025
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास 26 तारखेपर्यंत मुदतवाढ • सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा
हिंगोली(जिमाका), दि.25: राज्य शासनाच्या वतीने यावर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 च्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांना सहभागी होता यावे, यासाठी आता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 26 ऑगस्ट, 2025 असेल.
या स्पर्धेचे अर्ज या संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पारितोषिके जिंकण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
*****
22 August, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे महसूलमंत्र्यांनी केले कौतुक
•हिंगोली जिल्ह्याचे प्रशासन लोकाभिमुख करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
हिंगोली, दि.२२: महसूल विभागाने सेवा वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. ‘सेवा दूत’ प्रणालीद्वारे लोकांना आवश्यक कागदपत्रे आणि खर्चाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केल्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक केले.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी हिंगोली जिल्ह्याचा दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे आणि प्रतीक्षा भुते यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सरकारी जागांवर धनदांडग्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर विशेष लक्ष द्या, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांनी गुरुवारी हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेतला. ते म्हणाले,"नागपूर पॅटर्न" नुसार गावांना भेटी देऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत.
बैठकीत महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, की महसूल खात्याने केवळ प्रशासकीय काम न करता, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पाच विषय प्राधान्याने हाताळावे आणि तहसीलदारांनीही वेगवेगळ्या किमान पाच विषयांवर काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि प्रशासकीय कामाला गती मिळेल.
अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर नियमांनुसार दंड आकारला जात नाही, अशी तक्रार नेहमीच विधानसभेत होते. त्यामुळे, अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर बाजार दराच्या पाचपट दंड आकारला जावा. तर तीन वेळा गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एमपीडीए लावण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.
• *प्रशासनात पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर*
महसूल विभागाने सेवा वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. ‘सेवा दूत’ प्रणालीद्वारे लोकांना आवश्यक कागदपत्रे आणि खर्चाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.अशी व्यवस्था केल्याने त्यांनी हिंगोली जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांचे कौतुक केले. तसेच, ‘थम आणि फेस ॲप’ पद्धतीचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक सोपे आणि जलद करण्यात यावे. ‘संजय गांधी निराधार’ आणि ‘श्रावणबाळ सेवा’ योजनेच्या लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक करून त्यांना डीबीटीद्वारे पेन्शन मिळेल याची खात्री करण्यासाठी तलाठ्यांना घरोघरी पाठवण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
• *प्रलंबित खटले ९० दिवसांत निकाली काढा*
अर्धन्यायिक खटल्यांमध्ये स्पष्ट आणि जलद निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांत सर्व प्रलंबित खटले निकाली काढा. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानसारखे अभिनव कार्यक्रम राबवून लोकांचे प्रश्न त्यांच्या दारातच सोडवावे,असेही निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले.
*******
रोजगार मेळाव्यात 96 उमेदवारांची निवड
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर या पात्रतेच्या 233 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर हे होते. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रमन तोष्णीवाल, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, डॉ. आर. ए. जोशी, डॉ. वाय. एस. नलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य बोथीकर यांनी मुलाखतीचे ठोकताळे सांगत करियरसाठी स्वत:चे गाव सोडून उमेदवारांनी मिळेल तेथे नोकरी मिळवावी आणि स्वत:ची क्षमता सिद्ध करावी, असा मंत्र दिला. रमण तोष्णीवाल यांनी आपल्या परिसरातील कामाच्या मागणीनुसार स्वत: रोजगार मिळवत युवकांनी रोजगार निर्मिती करणारे बनावे, असे आवाहन केले. सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी साचेबद्ध सरकारी नोकरीची अपेक्षा न बाळगता खाजगी क्षेत्रातील संधीचे सोने करावेत, असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोपात डॉ. तळणीकर यांनी रोजगार मेळावे ही युवकांसाठी चालून आलेली संधी आहे. या संधीचे सोने करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी. यु. केंद्रे यांनी तर आभार डॉ. डी. जी. सावंत यांनी मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, राजाभाऊ कदम, नागेश निरदुडे, रमेश जाधव, पवन पांडे, प्रवीण राठोड, अभिजीत अलोने आणि तोष्णीवाल महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. पी. नाईक, डॉ. एन. एस. बजाज, डॉ. पी. एन. तोतला, डी.डी.थोरात, एस. एस. मरकड, डी. पी. तडस, एन. एस. गायकवाड, के. एस. पवार, एच. टी. शिंदे, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*****
कृषी अधिकाऱ्यांना केळी पिकाबाबत प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि. 22 : कृषी विभाग हिंगोली अंतर्गत सर्व मंडळ कृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांचे केळी पिकावरील एकात्मिक कीड व रोग सर्वेक्षण (हॉर्ट सॅप) या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम आज तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये यशस्वीपणे संपन्न झाला.
या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, पशुविज्ञान विभागाचे डॉ. कैलास गीते, वाशिम कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. डी. एन. इंगोले उपस्थित होते.
प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयाचे तज्ञ प्रा. अजयकुमार सुगावे यांनी केळी पिकातील प्रमुख कीड व रोग तसेच त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध निविष्ठांची माहिती दिली. तसेच कृषी विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्रित काम झाल्यास अधिक चांगला परिणाम साधता येईल, असे सांगितले. तसेच बैलपोळ्याच्या सणानिमित्त हिंगोलीतील सर्व शेतकरी व कृषी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रशिक्षणाला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत मंडळातील कृषी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कैलास गीते यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल जाधव व आकाश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
******
रेल्वे अधिकारी-कर्मचारी यांची एचआयव्ही संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 22 : येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने हिंगोली रेल्वे स्टेशन येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची एचआयव्ही/एड्स संवेदीकरण कार्यशाळा रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाली.
यावेळी रेल्वे इंजिनिअर श्री. सर्वेश, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी व रेल्वे विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समुपदेशक बालाजी चापाकानाडे यांनी एचआयव्ही एड्सबद्दल सखोल माहिती दिली, तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी.एस.चौधरी यांनी 2017 चा एचआयव्ही/एडस् कायदा, जिल्ह्यातील एचआयव्हीची सद्यस्थिती सांगून सर्वांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदणानी, बालाजी चापाकानडे, इरफान कुरैशी यांनी परिश्रम घेतले.
***
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 22 : उद्योग विभागाच्या अडी-अडचणी एकाच क्षेत्राखाली सोडविण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी उद्योजक, व्यापारी संघटना यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. उद्योगाविषयी उद्योजकांच्या तक्रारी एक खिडकीद्वारे सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा नोडल अधिकारी यांच्याकडे आपले निवेदन सादर करावे, अशा सूचनाही दिल्या.
राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे,त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन देवून रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही महत्वकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योजकात वाढ होण्यासाठी आज झालेल्या डीएलटीएफसी बैठकीमध्ये 158 कर्ज प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली आहे.
या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, खादी ग्रामोद्योग अधिकारी, उद्योग संघटनेचे सचिव प्रवीण सोनी, नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक, विविध उद्योग संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
*****
खेकड्यांच्या प्रजनन हंगामात खेकडे पकडण्यास बंदी
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे तलाव जलाशयात, तसेच नद्यांमध्ये पावसाळी काळात गोड्या पाण्यातील खेकड्यांचे नैसर्गिक प्रजनन मोठ्या प्रमाणावर सुरू होते. प्रजनन काळात गरोदर मादी खेकडे तसेच अंडी व पिल्ले धारण केलेली मासे व खेकडे याची शिकार होत असते. हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर व हानिकारक आहे.
मच्छीमार बांधवांना व मत्स्य सहकारी संस्थांनी पावसाळी हंगामात खेकडे, विशेषतः मादी खेकडे आणि प्रजनन करणारे मासे न पकडणे ही नैतिक जबाबदारी आहे. या काळात खेकड्याचे शिकार टाळल्यास पुढील काळात खेकड्यांचा साठा अधिक प्रमाणात वाढतो. ही जैवविविधतेसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आहे.
या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व मच्छीमार व मत्स्य सहकारी संस्थांनी पुढाकार घेवून प्रजनन हंगामात नदीतील मासे व खेकडे यांची शिकार यापासून दूर रहावे व नैसर्गिक संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.
*****
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच हिंगोली जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांच्या वतीने हॉकीचे जादूगर मेजर ध्यानंचद यांचा जन्म दिवस दि. 29 ऑगस्ट हा दिवस तालुका क्रीडा संकुल येथे साजरा करावयाचा आहे. या दिवशी मेजर ध्यानंचद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हिंगोली जिल्ह्यातील विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडू व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी सकाळी 10.30 वाजता तालुका क्रीडा संकुलावर खुल्या मॅरेथान व महिला कबडी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद मैदान हिंगोली येथे शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा, तर जिल्हा क्रीडा संकुल येथे शालेय कराटे क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंनी आपल्या सत्कार सोहळ्यासाठी नामांकने दि. 28 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोली कार्यालयात सादर करावेत व या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
*****
वसमत आयटीआयमध्ये निदेशक नियुक्तीसाठी 26 रोजी मुलाखत
हिंगोली (जिमाका), दि. 22 : वसमत येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेमध्ये आयटीआय सोलार टेक्नीशियन इलेक्ट्रीकल या ट्रेडसाठी तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्यासाठी निदेशक नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी दि. 26 ऑगस्ट रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पदासाठी इलेक्ट्रीकल इंजिनियरींग पदवीधारक व पदविकाधारक पात्र उमेदवारांनी बायोडाटा व अर्ज दि. 26 ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत संस्थेमध्ये सादर करावे व दि. 26 ऑगस्ट रोजी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे.
******
हिंगोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर
हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 जागा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या 104 जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
ही अधिसूचना हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
*****
21 August, 2025
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मोटारसायकल रॅली संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याच अनुषंगाने आज कै. बाबुराव पाटील महाविद्यालय हिंगोली येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला प्राचार्य डॉ. जयवंत भोयर यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
ही रॅली वाशिम रोडहून शिवाजी चौक मार्गे पोस्ट ऑफीस, जवाहर रोड, गांधी चौक, अग्रसेन चौक अशी शहरातील प्रमुख मार्गावरून निघून सामान्य रुग्णालयात समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये हिंगोली शहरातील कै.बाबुराव पाटील महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, पठाडे महाविद्यालय व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी. एस. चौधरी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांना युवा दिनानिमित्त शपथ दिली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, डॉ. डूडूले, गणेश साळुंके व इतर अधिकारी, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बलखंडे, प्रा. संभाजी पाटील , प्रा.डॉ. सोनकांबळे, प्रा. भागवत सावके, प्रा. माणिक डोखळे, प्रा.नागनाथ फड, प्रा.कृष्णा इंगळे व इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, टिना कुंदनानी, आशिष पाटील, बालाजी चाफाकानडे, अब्दुल मुजीब, महानंदा साबळे, स्वाती चोपडे, सुनीता गायकवाड, विनीत उबाळे, बालाजी कदम, रेखा बलखंडे, नम्रता भगत व इतर आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
***
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे 13 सप्टेंबर रोजी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 21 : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बँक, ग्रामपंचायत, नगर परिषद यांचे वाद दाखलपूर्व प्रकरणे हे तडजोडीच्या आधारे निकाली काढण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये सर्व विधिज्ञांनी जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोड करुन निकाली काढावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. भुक्तार यांनी केले आहे.
*****
आदर्श महाविद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन शिबीर संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 21 : येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने व प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आदर्श महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय युवक दिन व विविध विषयावर दि. 14 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे समन्वयक तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) वि. म. मानखैर उपस्थित होते. यावेळी वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ एस. के. सिरसाठ, प्राचार्य डॉ. विलास आघाव उपस्थित होते.
या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक ॲड. एस. के. सिरसाठ यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी व कॉलेजमधील नवीन विद्यार्थ्यांना रॅगींगमुळे होणारा त्रास व त्यावरील कायदा या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ॲड. अविनाश बांगर यांनी आंतरराष्ट्रीय युवक दिनाविषयी सखोल मार्ग करुन उपस्थित विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा खाणार नाही याची शपथ दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वि. म. मानखैर यांनी तरुण युवक हे देशाचे उज्वल भविष्य निर्माण करणारी पिढी आहे. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा तसेच राष्ट्रीय खेळामध्ये भाग घ्यावा, वाम मार्गाला लागू नये व आज्ञाधारक राहावे, असे मार्गदर्शन केले.
या शिबिरास आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समितीचे अतुल चाटे, शितल मुंढे उपस्थित होते.
*****
उद्योग विभागाच्या विकास आयुक्तांकडून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सन्मानित
• मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची 103 टक्के उद्दिष्ट पूर्तता
हिंगोली (जिमाका), दि. 21 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना दि. 1 ऑगस्ट, 2019 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यास 503 कर्ज प्रकरणाचे लक्ष्यांक देण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राने 31 मार्च 2025 अखेर 520 कर्ज प्रस्ताव मंजूर करुन 103.38 टक्के लक्ष्यांक पूर्ती केल्यामुळे हिंगोली जिल्हा राज्यात 12 व्या स्थानी आला आहे. या कार्याची दखल घेऊन उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना प्रशस्तीपत्र देत सन्मानित केले आहे.
हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, उद्योग निरीक्षक एस. एस. दुलेवाड, श्रीमती एस.एस. सवराते, अधीक्षक पी. व्ही. मेंढे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी काम केले आहे.
सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास 1 हजार कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. नवउद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
*****
शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर
हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा जून 2025 मध्ये इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि. विषयाची परीक्षा दि. 18 ते 24 जून, 2025 या कालावधीत आणि मराठी व हिंदी 30 व 40 श.प्र.मि. या विषयाची परीक्षा दि. 30 जून ते 4 जुलै, 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दि. 19 ऑगस्ट, 2025 रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रिंट घेता येईल.
विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे 100 जीएसम कागदावर करुन विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधित विद्यार्थ्यास सॉफ्टकॉपी पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी. जेणे करुन विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र कलर प्रिंटरद्वारे कागदावर छपाई करुन घेता येईल, संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करुन ठेवावी.
निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात परीक्षार्थींने गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुण पडताळणीसाठी प्रती विषय 100 रुपयाप्रमाणे व छायाप्रती मिळण्यासाठी प्रती विषय 400 रुपयाप्रमाणे रक्कम ऑनलाईन पध्दतीने दि. 29 ऑगस्ट, 2025 पर्यंत भरण्यात यावेत. गुण पडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी प्रती विषय 600 रुपयाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
******
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 परीक्षेचे आयोजन दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. 1 (इयत्ता 1 ली ते 5 वी स्तर) व पेपर क्र. 2 (इयत्ता 6 वी ते 8 वी स्तर) चा अंतिम निकाल दि. 14 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे.
या परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद/शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांच्या कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात येत आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांच्या कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दि. 1 ते 8 सप्टेंबर, 2025 या कालावधीत केले जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांच्या कार्यालयाशी स्वत: संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या https://www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले जाणार आहे. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम 25 ऑगस्ट, 2025 असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिध्द गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिध्द करता येईल. याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटूंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे ganeshotsv.pldmka.com.in या पोर्टलद्वारे प्रसिध्द करावी व सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम, गड किल्ले संवर्धन, राज्य व राष्ट्रीय स्मारकांचे जतन, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, देशी खेळांचे संवर्धन व प्रचार प्रसार, आरोग्य शिक्षण कला क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील कार्य, कायमस्वरुपी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वाचनालय, महिला सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रचार व प्रसिध्दीचे कार्य, नवसंशोधन, पर्यावरण पूरक मूर्ती, सजावट व प्रदूषणरहित वातावरण अशा विविध बाबींच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे. या गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.
******
20 August, 2025
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
• 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
• हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्य शासनाच्या वतीने दि. 27 ऑगस्ट, 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत संस्था किंवा स्थानिक पोलीसाकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था याची परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. दि. 20 जून, 2025 च्या शासन निर्णयात नमूद निकषाची पूर्तता करणाऱ्या, करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना शासन निर्णयातील परिशिष्ट अ येथे आहे. या गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर दि. 26 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. शासन निर्णयातील निकषाची पूर्तता केलेल्या जिल्ह्यातून एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस करण्यात येईल.
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम 5 लाख, द्वितीय 2.5 लाख आणि तृतीय क्रमांक आलेल्या गणेश मंडळाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हास्तरावरुन जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
विशेष लेख - रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !
• 30 रुग्णांना उपचारासाठी 23 लक्ष रुपयांचा निधी वितरीत
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आला असून, या कक्षामार्फत गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी पैशाची चणचण भासते. त्यामुळे बरेचदा रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक वेळेत उपचार घेऊ शकत नाहीत. अशावेळी कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचार न घेता परत जाता कामा नये. त्याच्यावर वेळेत उपचार व्हावेत आणि त्याचा जीव वाचावा, यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या कक्षाची स्थापना केली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना आणि पर्यायाने त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे. आजकाल दैनंदिन आयुष्यात अनेकदा आरोग्यपूर्ण जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अनेकदा एखाद्या कुटुंबावर अचानक गंभीर आजाराचा, अपघाताचा आघात होतो. रुग्णासह संपूर्ण कुटुंबाचा धीर खचून जातो. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज राहिली नसून प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाची स्थापना 1 मे 2025 पासून करण्यात आली आहे. रुग्णांना आता त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात उपचारासाठी मदतीसाठी अर्ज करता येणार असून, अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहितीसुद्धा त्यांच्या जिल्ह्याच्या कक्षात मिळणार आहे.
हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. येथे डॉ.नामदेव कोरडे हे कार्यरत असून, या कक्षामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत या निधीच्या माध्यमातून 30 रुग्णांना मदत केली आहे. यासाठी 23 लक्ष रुपयांचा निधी गेल्या 3 महिन्यात वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय हिंगोली कक्षाच्यावतीने दिली आहे.
शामराव किशनराव सूर्यवंशी हे हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा (ता.कळमनुरी) येथील रहिवाशी आहेत. ते व्यवसायाने शेतकरी असून, नेहमीप्रमाणे ते, त्यांचा भाऊ आणि मुलगा असे तिघेजण 23 जून 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शेतीकाम करून घराकडे परतत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला व पायाला मार लागला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शामराव सूर्यवंशी यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील तुकामाई हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी ते एकसारखी बडबड करत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुढील तपासणी केली असता, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचे निदान झाले. पुढील उपचाराठी यशोसाई रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा मुलगा अविनाश याने हिंगोली येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे अर्ज दाखल केला.
त्यामुळे त्यांना 70 हजार रुपयांची मदत झाल्याचे सांगत त्यांचा मुलगा अविनाश सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि राज्य शासनाने आभार मानले आहेत. केवळ 2 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना नाकीनऊ येत असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळे माझ्या वडिलाचा जीव वाचला असल्याचा आनंद अविनाश सूर्यवंशी यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
सध्या वडील शामराव सूर्यवंशी यांच्यावर घरी औषधोपचार सुरु असून, लवकरच ते पूर्ववत आपले दैनंदिन जीवन जगण्याचा आनंद घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अविनाश याने महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मदत मिळाल्यामुळे त्यांच्या वडिलांचा जीव वाचला, याबाबत त्यांनी मनापासून आभार मानले. गरजू व पात्र लाभार्थ्यांना या मदतीमुळे खूप मोठा आधार मिळत असून ही मदत गरजू रुग्णांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरत आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*******
कर सणानिमित्त वाई गोरखनाथ मार्गावरील वसमत-औंढा रोडवरील वाहतूक मार्गात बदल
हिंगोली (जिमाका), दि. 20 : दरवर्षी कर सणाच्या दिवशी कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 10 ते 15 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्यासाठी घेऊन येतात. त्यामुळे वसमत-औंढा रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर सणानिमित्त वाई येथे बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होते. हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने या रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टी पॉईंट ते नागेशवाडीपर्यंत रहदारीचा रस्ता हा दि. 22 ऑगस्ट, 2025 च्या मध्यरात्रीपासून ते दि. 23 ऑगस्ट, 2025 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळा बाजारमार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे व छत्रपती संभाजीनगरकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटामार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
या आदेशाची माहिती पोलीस अधिकारी वाहतूक यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्द करावी व सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलीस स्टेशन कार्यालयाच्या सूचनाफलकावर डकवावी. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
******
अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूकप्रकरणी जप्त वाहनांचा जाहीर लिलाव
हिंगोली (जिमाका), दि. 20 : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेली आहेत. जप्त वाहने सोडविण्याबाबत संबधितांना वारंवार कळविण्यात येऊनही दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही. तसेच अवैध वाहतूक करताना वाहन जागेवर सोडून गेलेले वाहन मालकांची वाहने सोडून देण्यासाठी दंडात्मक रक्कम भरण्यासाठी तहसील कार्यालयास आलेले नाहीत.
अशी चार वाहने व 9 निर्लेखित ट्रॉली अशा एकूण 13 वाहनांचा जाहीर लिलाव मंगळवार, दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, हिंगोली येथे ठेवण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
******
जिल्हाधिकाऱ्यांची हट्टा येथील स्मार्ट प्रकल्पाला प्रक्षेत्र भेट
हिंगोली, दि. 20 (जिमाका) : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात मंजुरी मिळालेल्या विविध समुदाय आधारित संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज वसमत तालुक्यातील हट्टा येथील हट्टावाला फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.ला प्रक्षेत्र भेट दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र कदम, जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे स्मार्ट नोडल अधिकारी गोविंद बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ तथा कृषि व्यवसाय सल्लागार जी. एच. कच्छवे, तसेच कंपनीचे संचालक फहिमोद्दीन सिद्दिकी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कंपनीच्या गोदाम बांधकाम व मशिनरी शेड बांधकामाची पाहणी केली. ही कामे मानकानुसार व नियोजित कालावधीत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्यांनी मंजूर उपप्रकल्पांतर्गत स्थापन होणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणांची माहिती घेतली. यात दाल मिल (2 टीपीएच) रंगीत सॉर्टरसह स्वयंचलित आणि बेसन मिल पीन मिल 1 टीपीएच यंत्रणांचा समावेश असून, या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर मूल्यवृद्धी करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
या यंत्रणांची कार्यप्रणाली, क्षमता, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत स्थानिक शेतकऱ्यांना मिळणारे लाभ याबाबत संचालक मंडळाशी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चर्चा केली. त्यांनी प्रकल्प शक्य तितक्या लवकर कार्यान्वित व्हावा यावर भर देत कंपनी संचालकांना यंत्रणा स्थापनेसाठी आणि व्यापारी व्यवहारिकदृष्ट्या आवश्यक बाबींच्या गतीमान अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या मूलभूत सुविधा व आधुनिक प्रक्रिया यंत्रणेची सविस्तर पाहणी करून शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या प्रक्षेत्र भेटीदरम्यान कंपनीसमोरील वीजपुरवठा समस्येचीही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. त्यांनी महावितरण यंत्रणेचे अभियंता श्री. चाकूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून, कंपनीसाठी आवश्यक असलेला एक्सप्रेस फिडर त्वरीत उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा उपलब्ध होणार असून, उत्पादन प्रक्रियेतील अडचणी दूर होण्यास मदत होईल.
या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित संचालकांशी संवाद साधत शेतकऱ्यांना उत्पादक संस्थांद्वारे थेट बाजारपेठेशी जोडून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत भर दिला. त्यांनी कंपनीचे संचालक मंडळ व शेतकरी यांना गुणवत्तापूर्ण उत्पादन, बाजारपेठेत स्पर्धात्मक दर, तसेच ब्रॅंडिंग व पॅकेजिंगवर भर देण्याचे आवाहन केले.
या भेटीमुळे हट्टा येथील स्मार्ट प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असून, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि उत्पादनात मूल्यवर्धन, रोजगारनिर्मिती व आर्थिक सबलीकरणाचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
*****
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता अतिवृष्टी बाधित पाहणीसाठी थेट शेतीच्या बांधावर !
• नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
हिंगोली, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, उडीद, कापूस आदी पिकांवर कीडरोग आणि पावसामुळे झालेल्या पाणी साचल्याने पिके आडवी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज बुधवारी (दि. 20) वसमत तालुक्यातील हट्टा येथे थेट शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जावून बाधित पिकांची पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शेतशिवारात जाऊन सोयाबीन पिकावर पडलेल्या कीडरोगाचा प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांनी अतिवृष्टी व रोगराईमुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सोयाबीन पिकाचे कोमेजलेले रोपे, पाने गळणे, काडांवर कीड लागणे, तसेच मुसळधार पावसामुळे पिके जमिनीत पडल्याची उदाहरणे मांडली.
पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश
या सर्व परिस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी “शेतकऱ्यांचे नुकसान तात्काळ नोंदवून पंचनामे करून अहवाल तयार करावा. कोणत्याही शेतकऱ्याला यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. तर पंचनाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून व विविध शेतकरीहिताच्या योजनांमधून मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्याच्या अडचणी सोडवणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती मदत तातडीने दिली जाईल, अशा शब्दांमध्ये जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर तांडा येथे भेट देऊन गौण खनिज साठे येथे भेट देत पाहणी केली.
*****
19 August, 2025
कृतिसंगमबाबत आवश्यक ते सहकार्य करणार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
* महिला आर्थिक विकास महामंडळाची जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 19 : नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणारे उप प्रकल्प तसेच माविममार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच महिला बचत गट कर्ज, वैयक्तीक उद्योग व्यवसायाचे कर्ज गावपातळीवर विविध यंत्रणाच्या माध्यमातून राबविण्यासाठी कृतीसंगमबाबत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आज नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीमध्ये, आरोग्य तपासणी, जाणीव जागृती कार्यक्रम, जिल्हा उद्योग केंद्रा, खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, महिला बाल कल्याण विभाग तसेच इतर यंत्रणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. माविम मित्रमंडळ, कायदा साथी, संयुक्त मालकी हक्क उप प्रकल्पासाठी कृती संगम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला सहकारी संस्था स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सल्लागार समितीचे विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. विविध विभाग प्रमुखांनी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विविध योजनेचे प्रलंबित प्रस्ताव बँकानी तात्काळ निकाली काढावेत-जिल्हाधिकारी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच विविध योजनेतील प्रलंबित प्रकरणे बँकानी तात्काळ निकाली काढावेत, अशा सूचना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****
सण, उत्सव शांततेत साजरे करा - जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
हिंगोली (जिमाका), दि. 19 : गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, वाई गोरक्षनाथ यात्रा व दसरा महोत्सव हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत. जिल्ह्यात हे सण साजरे करतांना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून साजरे करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधिक्षक कमलेश मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. कोकाटे म्हणाले, डिजेचा आवाजामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषण मोठे होते. नागरिकांनी डीजे न लावता व विविध सामाजिक उपक्रम राबवून सण उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. कोकाटे यांनी केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. पोलीस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी. कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी. सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट करताना त्याची खातरजमा करावी. चुकीच्या पोस्टची माहिती दिल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्वांनी मिळून शांततेत व एकतेने सण साजरे करुन हिंगोली परंपरा कायम ठेवावी, अशा सूचना अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी दिल्या.
सामाजिक एकात्मता व अखंडता राखण्यासाठी प्रयत्न करावा. उत्सव साजरे करताना एकोप्याने, शांततेने व समोपचाराने साजरे करावेत. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सण, उत्सव आदर्श पद्धतीने साजरे करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिल्या.
शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव, ईद ए मिलाद व दसरा महोत्सव या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य, सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
*****
सण, उत्सव शांततेत साजरे करा
- जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
हिंगोली (जिमाका), दि. 19 : गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, वाई गोरक्षनाथ यात्रा व दसरा महोत्सव हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत. जिल्ह्यात हे सण साजरे करतांना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून साजरे करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधिक्षक कमलेश मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. कोकाटे म्हणाले, डिजेचा आवाजामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषण मोठे होते. नागरिकांनी डीजे न लावता व विविध सामाजिक उपक्रम राबवून सण उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. कोकाटे यांनी केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. पोलीस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी. कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी. सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट करताना त्याची खातरजमा करावी. चुकीच्या पोस्टची माहिती दिल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्वांनी मिळून शांततेत व एकतेने सण साजरे करुन हिंगोली परंपरा कायम ठेवावी, अशा सूचना अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी दिल्या.
सामाजिक एकात्मता व अखंडता राखण्यासाठी प्रयत्न करावा. उत्सव साजरे करताना एकोप्याने, शांततेने व समोपचाराने साजरे करावेत. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सण, उत्सव आदर्श पद्धतीने साजरे करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिल्या.
शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव, ईद ए मिलाद व दसरा महोत्सव या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य, सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
*****
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 29 मिमी पाऊस
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 28.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त 42.4 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी 14 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 34.1 (589.5), कळमनुरी 25.8 (711.6), वसमत 14 (655.7), औंढा नागनाथ 28.7 (676.8) आणि सेनगाव तालुक्यात 42.4 (601) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 19 ऑगस्ट, 2025 पर्यंत सरासरी 642.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 117.5 अशी आहे.
******
18 August, 2025
तोष्णीवाल महाविद्यालयात गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने गुरुवार (दि. 21) रोजी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात एस.के. सेप्टी विंग्स (पि) लिमिटेड (के.एल.ग्रुप/ॲमेझान) हैद्राबाद, आर्मस इंडिया प्रा.लि. वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, व्हेरॉक इंजिनअरींग लि. छत्रपती संभाजीनगर, नम्र फायनान्स लिमिटेड नाशिक, सुप्रीम इंडस्ट्रीज प्रा.लि.जळगाव, स्वतंत्र मायक्रो फायनान्स हिंगोली/वाशिम, मुथ्थुट फायनान्स हिंगोली, चैतन्या इंडिया फिन क्रिडेट लिमिटेड प्रा.लि.हिंगोली/कळमनुरी/सेनगाव, ग्लोबल पब्लीक स्कूल पिंपळखुटा हिंगोली, चंद्रा इलेक्ट्रीकल्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 250 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून ऑनलाईन अर्ज करून स्वत: मूळ कागदपत्रांसह तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे गुरुवार, (दि. 21) रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
******
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 27 मिमी पाऊस
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त 35 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी 14.1 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 32.2 (554.3), कळमनुरी 29.1 (689.2), वसमत 14.1 (645.4), औंढा नागनाथ 23.9 (645.2) आणि सेनगाव तालुक्यात 35 (560.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 18 ऑगस्ट, 2025 पर्यंत सरासरी 615.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 114.1 अशी आहे.
******
17 August, 2025
ग्रामीण रस्ते व पुल तात्काळ पूर्ववत करण्याबाबत तहसीलदाराच्या कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना सूचना
हिंगोली, दि.17 (जिमाका) : औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांनी आज जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना केल्या.
त्या अनुषंगाने औंढा नागनाथ तालुक्यात 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रस्ते व पुल नादुरुस्त झाले आहेत. वाहतुकीस अयोग्य झाले आहेत. दुरुस्ती न करता या रस्त्याचा वापर केल्यास अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे
औंढा नागनाथ ते देरगाव, रांजाळा ते वडद, येहळेगाव ते निशाना, असोला तर्फे लाख ते लक्ष्मण नाईक तांडा या गावांचे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व रस्ते व पुलांचे सर्वेक्षण तात्काळ करुन हे रस्ते व पूल नागरिकांना वापरण्यासाठी पूर्ववत करण्याचे सांगितले आहे.
******
विशेष लेख - गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मिळणारी मदत मोलाची
मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात यावे लागत असे. नागरिकांना या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, नागरिकांचा त्रास वाचण्यासाठी व त्यांना वेळेत मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.01 मे 2025 पासून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन केले आहेत.
यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यातच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सहज उपलब्ध, संलग्न रुग्णालयाची यादी, अर्ज आणि पाठपुराव्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही तसेच अर्ज स्वीकृती व सद्यस्थिती याची माहिती पुरवली जाणार आहे.
जिल्ह्यात या योजनेचा अनेक गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यातील एका लाभार्थ्याचे भाऊ संजय पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया….
माझे भाऊ हिरालाल सुभाष पवार, रा. खंडाळा, ता. हिंगोली, जि. हिंगोली, हा गोरेगाव येते राहत होता. त्यांना व्यवसायासाठी दुचाकीवर प्रवास करत असतांना अपघात झाल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्यामुळे नांदेड येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना यशोसाई हॉस्पिटल येथे तातडीने दाखल करण्यात आले. या गंभीर परिस्थितीत आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे आम्ही चिंतेत होतो. तेव्हा आम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेबद्दल कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार आम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांसह हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. यामध्ये आम्हाला या योजनेअंतर्गत 40 हजार रुपये आर्थिक मदत प्राप्त झाली.
या मदतीमुळे आम्हाला उपचार सुरू ठेवणे शक्य झाले आणि माझ्या भावाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे मी व माझा संपूर्ण परिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच आमदार तानाजी मुटकुळे यांनीही याबाबत पाठपुरावा करुन मदत मिळवून दिल्यामुळे त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो. आपण गरजू रुग्णांसाठी सुरु केलेली ही योजना आमच्यासारख्या अनेक कुटुंबासाठी खूपच मोलाची असल्याचे रुग्णांचे भाऊ संजय पवार यांनी यावेळी सांगितले.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
16 August, 2025
ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडणार; नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पात्रात उतरू नये
हिंगोली, दि.१६ (जिमाका) आज पहाटे तीन वाजल्यापासून ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार स्वरुपात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जयपूर बंधा-याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यानुषंगाने येणारा येवा लक्षात घेऊन १६ ते ३१ ऑगस्ट २०२५ साठी मंजूर द्वार प्रचालनानुसार धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त पाणी ईसापूर धरणाच्या सांडव्याची वक्र द्वारे आज, शनिवार, (दि.१६) रोजी सकाळी ९ वाजता उघडून पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी पैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन ईसापूर धरण पूरनियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
*****
15 August, 2025
आता हवी ती शासकीय कागदपत्रे मागवा आपल्या घरी
• हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून 'शासन आपल्या दारी' उपक्रमास पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
• पालकमंत्री श्री झिरवाळ यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक
• राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार
• व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज
• कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध
• नागरिकांचा वाचणार वेळ
हिंगोली (जिमाका), दि.15 : जिल्ह्यातील नागरिक व्हॉट्स अँप टेक्नोसेव्ही झाल्यामुळे त्यांना बदलत्या काळानुसार ऑनलाईन घरपोच सेवा मिळवून देण्यासाठी 'सेवादूत हिंगोली' प्रणाली व व्हॉटस्अप चॅटबोटच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाला.
यावेळी व्यासपीठावर सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपस्थित होते.
राज्यात प्रथमच अनोख्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाईनरित्या नागरिकांना सेवा पुरविण्यात येत असून, सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनातील 13 विभागाच्या सेवा या प्रणालीतून पुरविण्यात येत आहेत. ही सेवा व्हॉट्स अँप व संकेतस्थळावर उपलब्ध असून, टप्प्याटप्प्याने सर्वच सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची सेवा घेतल्याचे ते म्हणाले.
हिंगोली जिल्हा प्रशासनाने सेवादूत प्रणालीतून 'शासन आपल्या दारी' उपक्रमास पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात केली. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांचे विशेष कौतुक करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सेवाही तात्काळ ऑनलाईन सुरु करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सेवादूत उपक्रम राज्यातील इतरही जिल्ह्यात राबविणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ही सेवा व्हॉट्स अँप चँट बोट्स (9403559494) आणि संकेतस्थळावरही सुरू असून, नागरिकांना ऑनलाईन अर्ज करून कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून अर्जदार नागरिकांना हवी असलेली सेवा, लागणारी आवश्यक कागदपत्रे, ती सादर करण्यासाठी अपॉईंटमेंट घेण्याची वेळ आणि सेवा पुरविण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले शुल्क याची माहितीही मिळणार असून ही माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत आपले सरकार सेवा केंद्र चालक आपल्याला फोन करून आपण निवडलेल्या वेळेस व दिवशी आपल्या घरी येऊन आपण निवडलेल्या सेवेसाठी सर्व प्रक्रिया आपल्या घरीच पूर्ण करून घेतील तसेच निवडलेल्या सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काची आणि कागदपत्रांची माहिती सुद्धा आपल्याला नोंदणी करत असतानाच मिळणार आहे. तेवढेच शुल्क आपणास आपल्या घरी येणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र धारकाला द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे आपण निवडलेली प्रमाणपत्रे शासनाच्या नियमानुसार तयार झाल्यानंतर आपल्या घरी तोच आपले सरकार सेवा केंद्राधारक घरपोच आणून देणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना सांगितले.
तक्रार प्रणालीही आता व्हॉट्स अँप
'सेवादूत हिंगोली' या उपक्रमाप्रमाणेच अर्जदार नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, प्रशासनातील विश्वास व पारदर्शकता वाढवणे तसेच हिंगोलीला तक्रारमुक्त जिल्हा बनविण्यासाठी व्हॉटस्अप बेस तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. यासाठी 8545088545 हा व्हॉट्सअप क्रमांक विकसित करण्यात आला आहे. ही प्रणाली आजपासून सुरु होणार आहे.
या प्रणालीवर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर "Hi" असा मेसेज पाठवायचा. त्यानंतर तुमच्यासमोर एक मेनू येईल, ज्यात तक्रार नोंदविण्याचा पर्याय असेल. तुम्ही ज्या खात्याबाबत तक्रार करीत आहात ती निवडून तक्रारीचे तपशील, फोटो किंवा कागदपत्रे असल्यास ती अपलोड करता येतील. तक्रार आपोआप संबंधित विभागाकडे पाठवली जाईल. आठ दिवसांच्या आत समस्येवर कारवाई करून त्याचा अहवाल तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. कुठूनही, कधीही तक्रार नोंदवण्याची सुविधा असल्यामुळे वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचतो. पारदर्शक प्रक्रिया असून प्रत्येक टप्प्याची माहिती व्हॉट्सॲपवर तक्रार क्रमांक (ट्रैकिंग आयडी) मिळतो, ज्यामुळे प्रगती पाहता येते. यामुळे शासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधता येणार आहे.
से टू हाय कलेक्टर - लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन
केसेसची संभाव्य सुनावणीची वेळ पक्षकार तसेच वकिलांना उपलब्ध होऊन त्यांच्या वेळेचे योग्य नियोजन करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत से टू हाय कलेक्टर-ईक्यूजे कोर्ट लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून केसच्या आदल्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता केसेसचा बोर्ड सॉफ्टवेअर व मोबाईल अप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. या सॉफ्टवेअर व मोबाईल अप्लिकेशन हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील व मंडळ अधिकारी कार्यालयाकडून वापरण्यात येणार आहे. यामध्ये महसूल अर्धन्यायिक, राष्ट्रीय महामार्ग लवाद, पुरवठा विभाग, सरफेशी (बॅकेशी निगडीत प्रकरणे), राज्य उत्पादन शुल्क इत्यादी विभागांची प्रकरणे हाताळली जाणार आहेत.
*****
कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री
• स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उत्साहात
• निर्भया पथक व अँनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ
• स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ
हिंगोली (जिमाका), दि.15: सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवित आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करुयात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते.
यावेळी मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री. तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू उर्फ चंद्रकांत नवघरे, सर्वश्री माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, संतोष टारपे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील औंढा नागनाथसह पाच ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा हिंगोलीच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांची नियुक्त करण्यात आल्या असून, या कामांचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा विकास आराखडा 15 कोटी रुपयांचा आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असल्याचे सांगून यावर्षीही जिल्ह्यात “हर घर तिरंगा”हे अभियान राबविण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
"सेवादूत हिंगोली" ही वेब प्रणाली तसेच व्हाटस् अप चाटबोटच्या माध्यमातून नागरिकांना शासनाची हवी असलेली योजना, विविध कागदपत्रे सुलभरित्या घरपोच मिळणार आहे. तसेच लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन, से टू हाय- व्हॉटस्अप (8545 08 8545) बेस तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. ही सेवा नागरिकांच्या समस्या जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने सोडविण्यात उपयोगात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तसेच यावेळी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कृषी व कृषीपूरक व्यवसायासाठी आवश्यक असणारी औजारे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे कार्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नामुळे ‘वसमत हळद’या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाला आहे.
हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून 100 विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयात लवकरच हृदयरोग उपचारासाठी “कॅथ लॅब” कार्यान्वित होणार आहे. तसेच क्रिटिकल केअर ब्लॉक तसेच स्त्री रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत सुरु होईल, असे सांगून गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी लवकरच एमआरआय सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागातील विभागासाठी “मुस्कान प्रमाणपत्र”मिळवणारा हिंगोली पहिला जिल्हा ठरला आहे. तर पोषण व पुनर्वसन केंद्र, बालरोग विभागास राज्य स्तरावरील द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या केंद्रामुळे कुपोषित बालकास लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी डीबीटीद्वारे 333 कोटी 15 लक्ष वाटप तर चालू वर्षी जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी वितरणाची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध योजना गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, स्वाधार योजना, रमाई आवास घरकुल योजनांचीही माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान कुसूम योजना व मागेल त्याला सौरकृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 33/11 केव्ही उपकेंद्राच्या देण्यात आलेल्या लाभाचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत ई-साक्ष चा वापर ग्रामीण भागात फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपला जिल्हा, राज्य आणि देशासमोर अनेक समस्या एकजुटीने सोडविण्याला प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या शुभेच्छा संदेशपर भाषणातून सांगितले.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी केल्याबद्दल वसमत ग्रामीण पोलीस स्टेनशनचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक, सायबर सेलचे पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे यांना सेवा पदक तसेच सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, दिलीप मोरे, माधव जिव्हारे, रविकिरण खंडारे यांचा सन्मान करण्यात आला. 100 दिवसाच्या मोहिमेत दुसऱ्या टप्प्यातील मूल्यमापनात राज्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रथम क्रमांक मिळविलेल्या उप अभियंता एम. एस. देशमुख, सहायक निबंधक सहकारी संस्था श्री. कलटेवाड, वसमत तालुका क्रीडा अधिकारी निलकंठ श्रावण, तृतीय क्रमांक मिळविलेल्या वसमत पंचायत समितीचे प्रफुल्ल तोटेवाड, कुरुंदा पोलीस स्टेशनचे रामदास निरदोडे, वसमत पशुधन विकास अधिकारी संजय सावंत, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे उपअभियंता शेख सलीम, कळमनुरी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अबॅकस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम करणाऱ्या विद्यार्थी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन 2023-24 या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या घोटा, बोरी सावंत, दाताडा खु. या ग्रामपंचायतीस अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. किडनी व नेत्रदान केलेल्या अवयतदात्यांचाही यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी व पालकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीणचा जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.
यावेळी पोलीस विभागातर्फे दाखल झालेल्या निर्भया पथकाला तसेच देसाई फाऊंडेशन ट्रस्ट व उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या अँनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. तसेच यावेळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्त व अवयवदाची शपथ देण्यात आली.
देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या वीर पिता, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*****
Subscribe to:
Comments (Atom)





















