23 July, 2025

शिवाजी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात 112 उमेदवारांची प्राथमिक निवड

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच येथील शिवाजी महाविद्यालयात "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर या पात्रतेच्या 227 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवाजी महाविद्यालय संस्थेचे सचिव प्रणव पवार यांनी युवक-युवतींनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. प्राचार्य डॉ.बी. एस. क्षीरसागर यांनी चांगल्या ठिकाणी आत्मविश्वासाने मुलाखत द्यावी व नोकरीची संधी मिळवून घ्यावी, असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा एक योजनेचाच भाग आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना व स्थानिक पातळीवरील उद्योजक, महाराष्ट्रातील विविध कंपनीचे उद्योजक, रोजगार व स्वयंरोजगारासाठी इच्छूक उमेदवार तसेच शासनाच्या विविध महामंडळामार्फत चालणाऱ्या योजना या सर्वांना एकाच छताखाली एकत्र आणून रोजगार व स्वयंरोजगासाठी उमेदवारांनी संधी दिली जात असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. धाराशीव शिराळे यांनी केले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, राजाभाऊ कदम, नागेश निरदुडे, रमेश जाधव, पवन पांडे, प्रवीण राठोड, अभिजीत अलोने आणि शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.एस.यु.ढाले, डॉ.बी.एस. जाधव, डॉ.इक्बाल जावेद, अय्याज फारुकी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ******

No comments: