24 July, 2025

हिंगोलीत 27 वी सब-ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा ८ ऑगस्टपासून • जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोजनाबाबत आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 24 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 27 वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर फेन्सिंग स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आयोजनासंदर्भात महत्त्वाच्या बाबीवर आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. या बैठकीस निवासी जिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, नगरपालिका उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, पोलीस विभागाचे अखिल जब्बार व अतुल बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ए. ओ. कटोळे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. पी. डोंगरे, हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे अध्यक्ष कल्याण देशमुख, सचिव संजय भुमरे, सहसचिव नरेंद्र रायलवार आणि राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दि. 8 ऑगस्ट ते दि. 10 ऑगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर फेन्सिंग स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या बाबीचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होत असल्यामुळे त्या ठिकाणी खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी आवश्यक किरकोळ दुरुस्ती याचबरोबर स्वच्छतेची कामे करण्याच्या सूचना दिल्या. स्पर्धा कालावधीत खेळाडूंना भोजन, निवास या संदर्भात आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभागामार्फत सुसज्ज रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक ठेवावेत. जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार यांनी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. या बैठकीचे प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले. या बैठकीत 14 वर्षांखालील मुला-मुलींसाठीची ही राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा दिनांक 8 ते 10 ऑगस्ट 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा (मक्ता), हिंगोली येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुरक्षा, निवास, भोजन, आरोग्य तपासणी, आणि मैदानी व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाली. हिंगोली जिल्ह्याला प्रथमच अशा दर्जेदार फेन्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान लाभत असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे ठरवण्यात आले. **

No comments: