22 July, 2025

चाईल्ड हेल्पलाईनकडून हिंगोली शहरातील इंदिरा चौक परिसरात जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार हिंगोली शहरातील इंदिरा चौक परिसरात चाईल्ड हेल्पलाइन 1098 कक्षाकडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा बाल सरंक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाइन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर माहिती देण्यात आली. यामध्ये सुरक्षित स्पर्श ,असुरक्षित स्पर्श, बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याची कारणे याबाबत माहिती देण्यात आली. आपल्या सभोवताली कुठेही बाल विवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. 1098 हा बालकांकरीता तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. जेव्हा बालकाला मदतीची गरज असते त्यावेळी 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा, अशी माहिती चाईल्ड हेल्पलाईन पर्यवेक्षक धम्मप्रिया पखाले व श्रीकांत वाघमारे यांनी दिली. बालक म्हणजे काय, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत तसेच बालकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी समुदायातील लोकांनी पुढाकार घेऊन माहिती दिली पाहिजे, असे सांगितले. *****

No comments: