04 July, 2025

वाहनांसाठी सुधारित कर लागू

हिंगोली (जिमाका), दि. 04 : महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम-2025 मधील कलम 5(2) वगळता उर्वरित तरतुदीनुसार दि. 1 जुलै, 2025 पासून वाहनाना सुधारित कर लागू करण्यात आला आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. सीएनजी किंवा एलपीजीवर चालणारी खाजगी संवर्गातील 10 रुपयापर्यंत किंमतीच्या दुचाकी व चारचाकी वाहनाचा कर 7 टक्के होता तो आता 8 टक्के करण्यात आला आहे. 20 लाख रुपयापर्यंत किंमत असणाऱ्या वाहनाचा कर 8 टक्क्यावरुन 9 टक्के करण्यात आला आहे. 20 लाख रुपयापेक्षा जास्त किंमत असलेल्या वाहनाचा कर 9 टक्क्यावरुन 10 टक्के करण्यात आला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या 30 लाख रुपयापेक्षा अधिक किंमतीच्या वाहनावर 6 टक्के कर लावण्यात आला आहे. बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन्स, क्रॉम्पेअर्स, प्रोजेक्टर्स, किंवा खनित्रे (जेसीबी) या सारख्या मोटार वाहनावर सध्या जीव्हीडब्ल्यू (वजनावर) वार्षिक कर होता. आता मोटार वाहनांच्या किंमतीच्या 7 टक्के (एक रकमी कर) केला आहे. ओझे लादलेले असताना, ज्यांचे नोंदणीकृत वजन 7 हजार 500 किलोग्रॅमपेक्षा अधिक नसेल अशी माल किंवा सामग्री यांच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी हलकी मालवाहतूक वाहनावर वाहनाच्या जीव्हीडब्ल्यू (वजनावर) वार्षिक कर होता. आता मोटार वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के (एक रकमी कर) लागू केला आहे. सर्व वाहनधारक, वाहतूक संघटना यांनी वरीलप्रमाणे सुधारित कराबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments: