18 July, 2025

विशेष लेख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष : गंभीर आजारपणात मदतीचा हात

जिल्ह्यातील कोणताही गरजू रुग्ण केवळ पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी शासनाच्या विविध योजना कार्यरत आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी होय. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येते आणि या अंतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ या यंत्रणेमार्फत आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक जीवनदायिनी ठरली आहे. राज्य शासनाचा हा उपक्रम गरजू रुग्णांना आरोग्याच्या क्षेत्रात ‘मूलभूत हक्क’ बहाल करणारा आहे. गरजूंना उपचार मिळावेत आणि कोणताही व्यक्ती केवळ पैशाअभावी मरण पावू नये, ही या योजनेमागची खरी भावना आहे. गरीब व गरजू रुग्णांना कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, मेंदूशी संबंधित आजार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करताना लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे त्यांना महागड्या उपचारांचा खर्च परवडत नाही. हे लक्षात घेता, राज्य शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत रुग्णाच्या आजारानुसार 50 हजार ते 3 लक्ष रुपयांपर्यंतची मदत केली जाते. या कक्षाची कार्यप्रणाली ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आरोग्य विभागामार्फत मंत्रालयात कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी आवश्यक कागदपत्रांसह निधीसाठी अर्ज करावा लागतो. ही यंत्रणा पुढीलप्रमाणे कार्य करते: रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात किंवा संबंधित जिल्हा सामान्य रुग्णालयातून अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर अर्जासोबत दिलेल्या वैद्यकीय व आर्थिक कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत रुग्णाच्या आजाराची गंभीरता आणि उपचाराचा खर्च याचे मूल्यांकन केले जाते. संबंधित रुग्णाचा अर्ज वैध असल्यास या समितीकडून निधी मंजूर केला जातो आणि थेट संबंधित रुग्णालयाकडे वर्ग केला जातो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याचे आर्थिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी (साधारणतः १ लाख ते १.५ लाख रुपये वार्षिक) असावे. अर्जदाराकडे बीपीएल किंवा अंत्योदय कार्ड असणे फायदेशीर ठरते. केवळ गंभीर आजारांवर उपचारासाठी या कक्षाकडूनही मदत मिळते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून रुग्णाला आर्थिक मदत मिळविण्यासाठी रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकाला रुग्णाचे अर्जपत्र, डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, संबंधित रुग्णालयाचा खर्चाचा तपशील, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि रुग्णालयाचे नोंदणीकृत बँक खाते तपशील सोबत जोडावा लागतो. या कक्षामार्फत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात संपर्क करावा किंवा 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा 'सेतू केंद्र' येथे ही माहिती मिळते. तसेच मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात थेट अर्ज सादर करणे हा अर्ज आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून रुग्णाला उपचाराला थेट रुग्णालयात वर्ग करण्यात येतो. हा निधी रुग्णाच्या नावे नव्हे तर संबंधित रुग्णालयाकडे वर्ग केला जातो. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून तो देताना हृदय प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग यांसारख्या महागड्या उपचारांवर भर देत गंभीर आजारांसाठी प्राधान्य दिले जाते. हा निधी शासकीय व खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या नोंदणीकृत रुग्णालयांसाठी लागू असून, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ७–१५ दिवसांत तो वितरीत केला जातो. शासनाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणे सोयीचे झाले आहे. मदतीसाठी डॉ. नामदेव केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, हिंगोली येथे संपर्क साधता येईल. - जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ***

No comments: