25 July, 2025

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठवाडा उपविभागीय कार्यालयाचे बीड येथे रविवारी उद्घाटन

• लाभार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निवारण व योजनांचा व्यापक प्रसार हे उद्घाटनाचे मुख्य उद्दिष्ट हिंगोली, दि. 25 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेची मराठवाड्यातील वाढती व्याप्ती लक्षात घेता, महामंडळाच्या मराठवाडा विभागासाठी उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले असून, याचे उद्घाटन रविवार, (दि.27) रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे होणार आहे. या उपविभागीय कार्यालयाची स्थापना अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या विशेष सहकार्यातून करण्यात आली असून, उद्घाटनप्रसंगी लाभार्थींच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन व त्वरित निवारणासाठी विशेष मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या योजनांचा सरल व थेट लाभ मराठवाड्यातील मराठा समाजापर्यंत पोहोचवणे, ई-सेवा व खाजगी केंद्रांमधून होणारी फसवणूक रोखणे, प्रलंबित कर्ज प्रकरणे व व्याज परतावा त्रुटींवरील समस्यांचे निवारण करणे, तसेच तक्रारींवर हेल्पलाईनद्वारे त्वरित कारवाई करण्यासाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे. राजू कॉम्प्लेक्स, २रा मजला, हिना हॉटेलसमोर, जालना रोड, बीड येथे हे सुसज्ज व अद्ययावत उपविभागीय कार्यालय सुरु होणार असून, लाभार्थ्यांना येथे महामंडळाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. या कार्यालयामुळे मराठवाड्यातील लाभार्थ्यांना मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी धावपळ न करता स्थानिक पातळीवर सेवा मिळणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, भविष्यात तालुकास्तरावरही योजना पोहोचवण्यासाठी दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांची माहिती घेण्याचे व आपली तक्रार निवारण करून घेण्याचे आवाहन विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील यांनी केले आहे. ******

No comments: