19 July, 2025

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी घेतला सखी वन स्टॉप सेंटरचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि.19 : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आज येथील महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. या भेटी दरम्यान संकटात सापडलेल्या महिलांसाठी वन स्टॉप सेंटर 24x7 तास कार्यरत असून महिलांना एकाच छताखाली सुरक्षित निवारा, तात्काळ पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, कायदेशीर सल्ला तसेच आवश्यकतेनुसार त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात येते. सन 2019 पासून वन स्टॉप सेंटर कार्यरत असून आतापर्यंत 554 पीडित महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग व सखी वन स्टॉप सेंटर यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमा अंतर्गत तसेच संकटात सापडलेल्या महिलांच्या संदर्भात कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यापुढेही या कामकाजाची अशाच प्रकारे प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी संकटात सापडलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा याकरीता जास्तीत जास्त महिलांपर्यत सदर माहिती पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृण कोकाटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार, सहाय्यक लेखाधिकारी कमल शातलवार, विधी सल्लागार वर्षा पराते, कनिष्ठ संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, राजेश पांडे, वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक शिला रणवीर, समुपदेशक दिनेश पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments: