17 July, 2025

नागरिकांनी समाजमाध्यमे वापरताना काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• एक चूक आपले बँक खाते करू शकते रिकामे • आपले छायाचित्र वापरून होऊ शकते फसवणूक किंवा बदनामी हिंगोली (जिमाका), दि.17: जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, खास करून महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांची समाजमाध्यमांची खाती ही द्विस्तरीय सुरक्षित ठेवून सायबर चोरट्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवता येते. त्यासाठी खाती सुरक्षित ठेवण्यासोबतच नातेवाईकांशी संपर्क साधून खात्री केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार न करण्याचे किंवा बदनामीपासून वाचण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यातील मोठ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे एक फेक समाजमाध्यम खाते तयार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असून, त्यांचे फेक खाते संबंधित विभागाने तात्काळ बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ आपापली खाती टू स्टेप व्हेरिफिकेशन करून सुरक्षित करावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. सायबर चोर आपल्या नावाचे फेक खाते समाजमाध्यमांवर तयार करून आपल्या आप्तेष्ठांना, नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फसवणूक करू शकतात. तसेच आपले नातेवाईक आजारी आहेत. आपल्या खाते अपडेट करायचे आहे, केवायसी अपडेट करायची आहे किंवा इतरही काही कारणे सांगून आपली ओटीपीमार्फत फसवणूक केली जावू शकते. तसेच आपले फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राम यासह विविध समाजमाध्यमांवर आपले छायाचित्र वापरून नवे खाते तयार करून आपल्या मित्रांना, नातेवाईकांना विविध कारणांच्या माध्यमातून पैशांची मागणी करू शकतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन आपल्या नातेवाईकांशी थेट संपर्क साधून खात्री करून घ्यावी. त्यानंतरच पुढील आर्थिक वा इतर व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पीएम किसान लिस्टच्या एपीके फाईल येत असून या लिंकवर क्लिक केल्यास ते हॅक होत आहेत. तसेच मोबाईलमध्ये असलेले फोन पे अॅप, गुगल पे अॅप तसेच बँकेचे इतर अॅप्लीकेशनही हॅक होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले आहे. सायबर चोरट्यांपासून नागरिकांनी घ्यावयाची काळजी कोणत्याही एपीके फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नका. तसेच थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करू नयेत. आपल्या व्हॉट्सअप अॅपला टू स्टेप वेरिफिकेशन कोड लावून ठेवावा जेणेकरून ते दुसरीकडे उघडणार नाहीत. तसेच आपले इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट यांना प्रोफाईल लॉक करून ठेवावे. आपल्या बँक खात्याचा, यूपीआय, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्डचा क्रमांक तसेच इतर कोणताही ओटीपी अनोळखी व्यक्तींना सांगू नये. आपले आर्थिक नुकसान झाल्यास तात्काळ 1930 अथवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार द्यावी अथवा जवळचे पोलिस स्टेशन किंवा सायबर सेल, हिंगोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ऑनलाईन गेमींग अॅपपासून सावधान..! ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचे अमिष दाखविले जाते. या अमिषाला मोबाईलधारक बळी पडतो. तो मोह टाळावा. अॅप डाउनलोड करताना ॲटो रीड ओटीपीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आपल्या खात्यातून कल्पना नसतांनाही पैसे कमी होतात. अशा बनावट अॅपच्या माध्यमातून आपली फसवणूक टाळण्यासाठी असे मोफत ऑनलाईन गेमींग अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका. प्रतिबंधात्मक उपाय फेसबुक, व्हॉट्स ॲप, ट्वीटर, इंस्टाग्राम इ. सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींची मैत्री स्वीकारू नका तसेच आपली स्वतःची व कुटूंबाची माहिती शेअर करणे टाळा. ऑनलाईन मॅट्रीमोनीअल साईटवरील व्यक्तींना कोणतीही माहिती देऊ नका. आपल्या मोबाईलमध्ये अनोळखी अॅप डाउनलोड करू नका. अनोळखी फोन कॉलवर आपली वैयक्तीक अथवा आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका. तसेच आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीने पाठविलेला कोणताही क्यूआर कोड स्कॅन करू नका. इंटरनेटवरील नोकरीसंदर्भात विशेषतः विदेशातील नोकरी संधीच्या जाहिरातीची खात्री करा त्यांना आपली कोणतीही वैयक्तीक माहिती देऊ नका व आर्थिक व्यवहार करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. ***

No comments: