04 July, 2025

विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार व रामोशी समाजातील लोकांनी स्वयंरोजगारासाठी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

हिंगोली (जिमाका), दि. 04 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्ग तसेच पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उप कंपनीमार्फत वडार व रामोशी समाजातील लोकांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघुउद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय तांत्रिक व्यवसाय, पारंपारिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे. वैयक्तीक कर्ज व्याज पुरवठा योजनेंतर्गत जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्यात येतो. गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही योजनामध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँक भरावयाचे आहे. त्यानंतर महामंडळाची व्याजाची रक्कम 12 टक्के पर्यंत लाभार्थ्यांच्या वैयक्तीक खात्यात जमा करते. या योजनांशी संबंधित सर्व माहिती व मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तसेच बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत (बँक सहभाग 75 टक्के व महामंडळ सहभाग 25 टक्के) महामंडळाच्या 25 टक्के सहभागावर 4 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येते. थेट कर्ज योजनेंतर्गत एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही योजनासाठी महामंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली-431513 दूरध्वनी क्र. 02456-223921 या महामंडळाच्या कर्यालयात संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छूक व्यक्ती व संस्थांनी वरील योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *******

No comments: