03 July, 2025

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्जाची महाडिबीटी प्रणालीवर नोंदणी सुरू

हिंगोली(जिमाका), दि.03 : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसाय अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता इत्यादी योजना माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांनी विकसित केलेल्या www.mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबाटी पोर्टल द्वारे ऑनलाईन रित्या राबविण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्ष सन 2025-2026 करिता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन व नूतनीकरणाच्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती पोर्टलवरून सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यवसायिक, बिगर व्यवसायिक, सर्व तांत्रिक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चीत होताच त्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी-पालक यांना सूचना देणे तसेच महाविद्यालयात कार्यरत समानसंधी केंद्रामार्फत अर्ज भरण्यास मदत करत महाविद्यालयातील सूचनाफलक, व्हॉट्सअप ग्रुपवरून कळविण्यात येऊन जास्तीत जास्त अर्ज नोंदणीकृत होतील याची खातर जमा करावी. दि. 7 जुलै, 2023 च्या शासन निर्णयानुसार अर्ज नोंदणीकृत करणे हा देखील प्रवेश प्रक्रियेचाच भाग आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळीच शिष्यवृत्तीच्या सर्व योजनांची माहिती प्रवेश माहिती पुस्तिकेद्वारे देण्यात यावी. जेणेकरून शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊन लगेचच शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज नोंदणीकृत होऊन विद्याथ्यांना विहित शिष्यवृत्ती रकमेची अदायगी करता येईल, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

No comments: