22 July, 2025

शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी घेतला समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 22 : शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करुन माहिती संकलीत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हा ऊसतोड कामगार समिती, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. बोराटे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग फोपसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी भाकरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीष रुणवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह सर्व बैठकीचे समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील 7 हजार 672 ऊसतोड कामगारांची आरोग्य विभागामार्फत नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून ऊस तोड कामगारांची यादी उपलब्ध करुन घ्यावी. या यादीतील ऊसतोड कामगारासह राहिलेल्या ऊसतोड कामगारांचा सर्वे आशा व बचतगटाच्या गट समन्वयकामार्फत (सीरपी) करण्यात यावेत. यासाठी ऊसतोड कामगारासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे आणि सर्व ऊसतोड कामगारांचा डाटा तयार करावा आणि त्यांना ई-श्रम कार्डासह शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. तसेच त्यांनी साखर कारखाने, ऊसतोड कामगारांची माहिती, नोंदणी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य समस्या, गर्भवती महिला ऊसतोड कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या सोईसुविधा आदी विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा दक्षता व समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्त प्रस्तावावर चर्चा करुन पात्र प्रकरणाला मंजुरी देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेत निवड केलेल्या गावामध्ये विविध विकासकामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. *****

No comments: