10 July, 2025

वार्षिक जिल्हा नियोजन 2025-26 साठी प्रस्ताव तात्काळ सादर करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. 10 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे प्रस्ताव तयार करून त्यांना तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी तात्काळ सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. यासोबतच सन 2024-25 या आर्थिक वर्षातील ताळमेळ अहवाल देखील त्वरित पाठवावा आणि दायित्वाचे प्रस्ताव आयपास प्रणालीवर त्वरित अपलोड करण्याचे त्यांनी संबंधित विभागांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे तसेच सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना गतवर्षी पूर्ण केलेल्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र तात्काळ सादर करण्याच्या सूचना देताना, त्यांनी नाविन्यपूर्ण घटकांमध्ये लोककल्याणकारी उद्दिष्ट समोर ठेवून काम करण्याचे निर्देश दिले. विशेषतः गत आर्थिक वर्षात पूर्ण केलेल्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र त्वरित सादर करावे. हे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय 2025-26 साठी निधी वितरित केला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. सर्व विभागांनी नाविन्यपूर्ण योजनांमधून जिल्ह्यातील विकासकामे अधिक लक्षवेधी करण्याबाबतच्या सूचना केल्या. यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले. *****

No comments: