23 July, 2025
उमरा, शिरडशहापूर येथील शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट
* गैरहजर शिक्षकांवर कारवाईचे आदेश
हिंगोली, दि.23 (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज उमरा व शिरड शहापूर येथील जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. शाळेच्या भेटीदरम्यान प्रभारी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक शेषराव बांगर आणि शिक्षिका विनापरवानगी गैरहजर असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आज उमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली असता, त्यांना शिक्षिका श्रीमती अंबरबडे या विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळून आल्या. तर दुसऱ्या शिक्षिका श्रीमती भोसले यांची अध्यापनातील कार्यक्षमता समाधानकारक नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी शाळेतील अभिप्राय नोंदवहीत नोंद केली आहे. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती अत्यंत कमी असल्यामुळे शिक्षिका श्रीमती अंबरबडे आणि श्रीमती भोसले यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले आहेत.
तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिरडशहापूर येथील प्राथमिक कन्या शाळेला भेट दिली असता, येथील शिक्षिका श्रीमती सुचिता लक्ष्मणराव माटे या गैरहजर असल्याचे आढळून आल्या. तर शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षिका श्रीमती ढोकाडे यांनी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्यासमक्ष श्रीमती माटे यांच्या पूर्वीच लिहिलेल्या विना दिनांक रजा अर्जांची नोंद घेतली. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षण विभागातील या बाबीबद्दल खेद व्यक्त केला असून, अशा कामचुकार शिक्षकांविरोधात प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच विनापरवानगी गैरहजर शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश दिले. इयत्ता पहिली आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जेमतेम असल्याचे त्यांच्या तपासणीअंती निदर्शनास आले असून, त्यांना पायाभूत शैक्षणिक बाबीही येत नसल्याची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अभिप्राय नोंदवहीत नोंद केली आहे. त्याशिवाय येथील शाळेत मानधन तत्वावर कार्यरत शिक्षिका पूनम स्वामी यांचाही समाधानकारक अभ्यास नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनाही यापुढे कंत्राटी तत्वावर कायम न ठेवण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांना केल्या आहेत. उमरा व शिरडशहरापूर येथील शाळा भेटीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विद्यार्थ्यांचे अध्ययन फारच कमी असल्याचे तसेच गैरहजर शिक्षकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिलेत.
या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शिरड शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही पाहणी केली असून तेथील सेवांची स्थिती, रुग्ण संख्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती यांचीही चौकशी करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीचे प्रमाण वाढवावे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची शिबिरे आयोजित करावीत. बाह्य रुग्णविभागातील रुग्णांना औषधींचा पुरवठा व्यवस्थित करावा. तसेच औषधांच्या ई-औषधी पोर्टलवर व्यवस्थित नोंदी ठेवाव्यात. परिसरातील नागरिकांना आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या चाचण्यांचा पुरेपूर लाभ द्यावा, स्वच्छता ठेवावी. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहील याची दक्षता घ्यावी. तसेच कोणतीही तक्रार येणार नाही याचीही दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केल्या.
शासकीय सेवकांनी जबाबदारीने काम करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment