29 July, 2025

हिंगोलीत 'अमृत' कार्यालय सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या समन्वय बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अमृत योजनेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोत्रे व डाटा एंट्री ऑपरेटर संजय मेथेकर यांची उपस्थिती होती . या बैठकीदरम्यान 'अमृत' योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा होऊन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर अमृतच्या संपर्क कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. ही जागा ताब्यात घेऊन त्वरित कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याच दिवशीपासून सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 'अमृत' कार्यालयातून स्वयंरोजगार योजना, वैयक्तीक व्याज परतावा, तसेच प्रशिक्षणाशी संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे स्वीकारून प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे. या नव्या उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी एक नवा मार्ग उघडला असून, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केंद्र म्हणून 'अमृत' कार्यालय ठरणार आहे. अधिक माहितीसाठी आणि सेवा घेण्यासाठी अमृत कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोत्रे (7391065471) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. *****

No comments: