14 July, 2025

आदर्श महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात 159 उमेदवारांची प्राथमिक निवड

हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व आदर्श महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच येथील आदर्श महाविद्यालयात "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर या पात्रतेच्या 315 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 159 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास आघाव यांनी चांगल्या ठिकाणी आत्मविश्वासाने मुलाखत द्यावी व आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, असा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, आज उमेदवारांना भलेही कमी पगाराची नोकरी मिळेल पण सर्व युवकांनी मिळेल ती संधी स्वीकारली पाहिजे. या संधीतून मिळालेल्या कामाचा अनुभव पुढील संधीसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे युवकांनी मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर शिंदे यांनी व आभार नवनाथ टोनपे यांनी केले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे राजाभाऊ कदम, नागेश निरदुडे, रमेश जाधव, पवन पांडे, प्रवीण राठोड, अभिजीत अलोने आणि आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.आशिष गट्टानी, डॉ.लक्ष्मण सोळंके, डॉ.माधव बळवंते, बंडू ठाकूर, संजय राठोड, धम्मपाल इंगोले, सुदर्शन निजलेवार व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ******

No comments: