14 July, 2025

राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्याचा क्रमांक आणण्यासाठी काम करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 14 : राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी 150 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व विभागांनी तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी आगामी 150 दिवसांमध्ये कार्यालये ई-प्रशासनाच्या दृष्टीने सर्वकष सुधारणा करुन हिंगोली जिल्ह्याचा क्रमांक आणण्यासाठी काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी बैठकीत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत ई-गव्हर्नन्स सुधारणा करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी, विविध विभागाचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. सर्व कार्यालयांनी ई-प्रशासन सुधारणा हा उपक्रम चांगल्या प्रकारे अंमलात आणावा. नागरिकांना शासनाकडून विविध प्रकारच्या सेवा, विविध प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ई-गर्व्हर्नन्सद्वारे पोर्टलवर उपलब्ध करुन द्यावेत. ई-प्रशासन सुधारणांबाबत राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा राज्य, विभाग व जिल्हा स्तरावरील सर्व कार्यालयांसाठी लागू राहणार आहे. ई-प्रशासन कार्यक्रमाचे मूल्यांकन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. यासाठी संकेतस्थळ अद्यावत करणे, आपले सरकार पोर्टल, ई-ऑफिस, डॅशबोर्ड तयार करावेत. तसेच नाविण्यपूर्ण वेब अप्लीकेशनचा वापर करावा. सर्व सेवाविषयक प्रकरणांचा निपटारा करावा. यामध्ये अनुकंपा नियुक्ती, गोपनीय अहवाल, विभागीय चौकशीची प्रकरणे, निवृत्तीवेतनाचे लाभ, आश्वासित प्रगती योजनेची प्रकरणे आदी सर्व प्रकरणे सप्टेंबर अखेर पर्यंत निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. ******

No comments: