10 July, 2025
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची 31 जुलैपर्यंत मुदत
· जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : यंदाच्या खरिप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होऊन 31 जुलैपर्यंतपीक विमा काढून आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पीक विमा समिती अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी केले आहे. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी ही असून, लोकचेंबर्स, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई-400059 असा या कंपनी कार्यालयाचा पत्ता आहे. या विमा कंपनीकडे संपर्क साधण्यासाठी plkvima@aicofindia.com ईमेल आहे. खरीप हंगामातील ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस अशी पिके असून, अधिसूचित क्षेत्रातील कर्जदार व बिगरकर्जदार शेतकरी दोघांनाही योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी ई-पीक पाहणी व अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांचा हप्ता हा खालीलप्रमाणे आहेत. ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही प्रती हेक्टरी 33 हजार रुपये असून, प्रति हेक्टरी 82.50 रुपये विमा हप्ता रक्कम आहे. सोयाबीनसाठी 58 हजार रुपये तर 1,160 रुपये विमा हप्ता, मूग पिकासाठी 26 हजार रुपये प्रति हेक्टरी तर विमा हप्ता 65 रुपये, उडीद पिकासाठी 25 हजार रुपये तर विमा हप्ता 62.50 रुपये, तूर पिकासाठी 43 हजार रुपये तर 430 रुपये विमा हप्ता आणि कापूस पिकासाठी 60 हजार रुपये प्रति हेक्टरी 600 रुपये प्रति हेक्टरी विमा हप्त्याची रक्कम भरावी लागणार आहे.
बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा प्राधिकृत बँकेत जाऊन अर्ज भरावा. तसेच कर्जदार शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग ऐच्छिक असून नकार देण्यासाठी किमान 7 दिवस आधी बँकेला लेखी सूचना देणे आवश्यक आहे.
आपले सेवा केंद्रामार्फत अर्ज भरताना केवळ 40 रुपये शुल्क आकारले जाईल. त्याबाबत अतिरिक्त शुल्क मागणाऱ्या आपले सेवा केंद्र चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. बोगस अर्ज अथवा गैरप्रकार केल्यास अर्जदाराला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल. शासकीय, गायरान, देवस्थान इत्यादी जमिनीवर विमा उतरवू नये. तशी तक्रार आल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
तक्रार निवारणासाठी खालील अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, शिवसंदीप रणखांब, (8766403179) हिंगोली, कंठाळू जाधव (7588153150) कळमनुरी, सुनिल भिसे (7588018667) वसमत, शिवप्रसाद संगेकर (8408840487) औंढा नागनाथ आणि संदीप वळकुंडे (8999235401) सेनगाव तसेच तक्रार सादर करण्यासाठी टोल-फ्री क्रमांक: 14447 आहे. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपल्या पिकाचा विमा लवकरात लवकर उतरवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment