04 July, 2025
शेतकरी उत्पादक कंपनीच्या आवश्यक साधनसामुग्रीसाठी वित्तपुरवठा उपलब्ध करुन देणार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला कृषी व पशुसंवर्धन विभागाचा आढावा
• हळद संशोधन केंद्रासाठी 2030 पर्यंत लागणाऱ्या आवश्यक साधनसामग्री, उपक्रमाचे नियोजन करा
• जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन करा
हिंगोली (जिमाका), दि.04 : जिल्ह्यातील होतकरु शेतकरी उत्पादक कंपनीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी व त्यांच्यामार्फत उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी व आवश्यक ती साधनसामग्री खरेदी करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी विभागाच्या आढावा बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षेतखाली कृषी विभागाच्या विविध योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, सर्व तालुका कृषि अधिकारी, विमा प्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यातील कृषी मालावर प्रक्रिया करुन जिल्ह्यातच विक्री करण्यासाठी जिल्ह्यात छोटे-उद्योजक तयार करावेत. त्यासाठी त्यांना उत्पादन क्षमता व आवश्यक साधनसामग्री आणि उद्दिष्ट ठरवून द्यावेत. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना पशुधन, शेतीपूरक उपकरणे, गांडूळ खतनिर्मिती यासारखे प्रकल्प राबवावेत. शेतकऱ्यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देऊन सक्षम करावेत. आपल्या जिल्ह्याचे उत्पादन वाढवावे. पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी सेंटरला शासन ठराविक रक्कम देते. परंतु आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर जास्तीची रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक सीएससी केंद्रावर तालुका कृषी अधिकारी यांचा संपर्क क्रमांकाचे सूचना फलक लावून विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी पैसे मागितल्यास संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. तसेच याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी रेशीम उत्पादन व शेतकऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार एकरवर तुती लागवडीचे नियोजन करावे. जिल्ह्यात तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करावेत. यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, करडईचे सुधारित बियाणे उपलब्ध करुन द्यावेत, असे सांगून जिल्हा तेलबिया अभियान समिती स्थापन करण्यास व आत्मा नियामक मंडळाने तयार केलेल्या जिल्हा कृती आराखड्यास मान्यता दिली. तसेच त्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप पेरणी, गतवर्षीचा पीक विमा वाटप सद्यस्थिती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, ॲग्रीस्टॅक योजना, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, एकात्मिक फलोत्पादन विकास, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, वैयक्तीक शेततळे, स्मार्ट प्रकल्प, सूक्ष्म सिंचन आदी योजनांचा आढावा घेतला.
हळद संशोधन केंद्रासाठी 2030 पर्यंत लागणाऱ्या आवश्यक साधनसामुग्री, उपक्रमाचे नियोजन करा
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 65 एकर जमीन उपलब्ध असून, या संशोधन केंद्रावर आतापर्यंत संरक्षण भिंतीचे काम झाले आहे. या संशोधन केंद्रासाठी 75 अधिकारी, कर्मचारी व 50 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार आहे. त्यासाठी मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतु सध्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांतून 10 पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक हळदीचे उत्पादन हिंगोली जिल्ह्यात होते. यासाठी संशोधन केंद्रात 2030 पर्यंत लागणारी आवश्यक साधनसामुग्री, बेणे लावण्यासाठी जागा, यंत्रसाम्रुगीची क्षमता, हळदीच्या वाणाचे महत्त्व, बेण्यासाठी लागणारी, जागा, परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण यासह संशोधन केंद्रासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रसामुग्री, उपक्रम याची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन द्यावी, म्हणजे त्यानुसार नियोजन करता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन करा
जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात दूध संकलन केंद्रे, पशुधन किती आहे आणि जिल्ह्याला दररोज लागणारे दूध याचे तपशीलवार नियोजन सादर करावे. तसेच दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम याची माहिती सादर करावी. तसेच जिल्ह्यात अंड्याचे व कोंबडी पालनाचे (पोल्ट्री) प्रमाण वाढविण्यासाठी पोल्ट्री फार्म तयार करण्यासाठी आवश्यक जागा, शेड उभारणी व पशु खरेदी यासह आवश्यक बाबीसाठी करावयाच्या उपाययोजना याचा सविस्तर तपशील मला तातडीने उपलब्ध करुन द्यावा, असे सांगून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शेळी गट, फोडर, दुधाळ जनावरांचे वाटप, कुक्कुटपालन यासह विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी लसीचा पुरेसा साठा, औषधी याचा आढावा घेऊन निर्देश दिले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment