14 July, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भाटेगाव येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राला भेट

हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी व जिल्ह्याचे मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राला नुकतीच भेट दिली. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी महोदयांना जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाच्या उपलब्ध संसाधनांबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, हिंगोली श्रावण व्यवहारे यांनी अवगत करुन दिले व जिल्ह्यातील मत्स्यउत्पादन वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद संदेश ढेंबरे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणीबाबत व मत्स्यव्यवसायाबाबत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी विचारणा केली. तसेच चालू प्रमुख कार्प प्रजनन हंगाम व मत्स्य उत्पादन वाढीसाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे महत्व याबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मत्स्यबीज उत्पादन केंद्राची सुधारणा व आधुनिकीकरण करण्याकरिता आवश्यक निधी भविष्यात उपलब्ध करुन देऊ, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. या भेटी दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रावण व्यवहारे, प्रेमदास राठोड व इतर कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: