30 July, 2025

हिंगोली जिल्ह्यात '300 आपदा मित्रांना' मिळणार प्रशिक्षण

हिंगोली, दि. 30 (जिमाका): राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या 'आपदा मित्र' योजनेअंतर्गत जिल्ह्यात 300 स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असून त्यात हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे आपत्तींमध्ये प्रथम प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक नागरिकांना प्रशिक्षित करून त्यांना सक्षम करणे, जीवितहानी कमी करणे व समाजात आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. यामुळे स्थानिक पातळीवर प्राथमिक प्रतिसादासाठी सज्ज मनुष्यबळ तयार होणार आहे. 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण, वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच, 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण (3 वर्षांकरिता), प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच किटचे वितरण आदी प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. आपदा मित्र निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहेत. भारताचे नागरिक व हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असावा. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचे वय 18 ते 45 वर्षां (विशेष बाबतीत 55 वर्षांपर्यंत वयमर्यादा) दरम्यान असावे. किमान 35 टक्के महिलांचा सहभाग आवश्यक असून, माजी सैनिक, डॉक्टर, अभियंते, वैज्ञानिक, निवृत्त आपत्कालीन सेवा कर्मचारी यांचा विशेष समावेश आहे. सर्वसामान्य नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनी, एनएसएस, एनसीसीचे स्वयंसेवक, एनजीओचे प्रतिनिधी व स्वयंसेवक या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांनी आपले नाव आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नोंदवावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 8408067158 / 02456-222560 या कार्यालयीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. ******

No comments: