29 July, 2025
जागतिक हिपॅटायटीस सप्ताहानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांची हिपॅटायटीस बी तपासणी • हिपॅटायटीस आजाराचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गंत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गंत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्र व 32 उपचार केंद्र याची उभारणी करण्यात आलेली आहे. या केंद्रामार्फत हिपॅटायटीस रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
हिपॅटायटीस या आजाराबद्दल समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी 'हिपॅटायटीस : लेटस् ब्रेक इट डाऊन' हे हिपॅटायटीस दिनाचे घोषवाक्य प्रसिद्ध केलेले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित्त दि. 22 जुलै ते दि. 28 जुलै, 2025 या दरम्यान सप्ताह साजरा करण्याबाबत सूचित केले आहे.
या अनुषंगाने हिंगोली जिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस सप्ताहानिमित्त दि. 28 जुलै 2025 रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांची हिपॅटायटीस बी तपासणी करुन निगेटीव्ह व्यक्तीस हिपॅटायटीस बी लसीचे (वॅक्सीन) तीन डोस (0, 1 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर) देण्यात आले आहे. तसेच गरोदार माता व इतर रुग्णांची हिपॅटायटीस बी व सी तपासणी करण्यात आली आहे.
जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली 28 जुलै 2025 रोजी 25 अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, भूलतज्ञ डॉ. नितीन पुरोहित, एमडी पॅथॉलाजीस्ट डॉ. कंठे, पॅथालॉजीस्ट डॉ. इंगोले, ज्ञानेश्वर चौधरी, सहायक अधिसेविका आशा क्षीरसागर, तातेराव डुकरे, मुकूंद शिंदे यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक लक्ष्मण गाभणे, औषध निर्माता मनोज इंगोले, कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले.
हिंगोली जिल्ह्यातील जनतेला या कार्यक्रमामार्फत दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी हिपॅटायटीस बी व सी रक्त तपासणी करावी व हिपॅटायटीस या आजाराचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment