14 July, 2025

उद्योजकांना सर्व परवानग्या तात्काळ उपलब्ध करुन द्या- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 14 : हिंगोली जिल्हा औद्योगिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व परवानग्या तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समिती, जिल्हा निर्यात प्रचलन समिती आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा कार्यबल समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी आर. एच. शिंदे, उप अभियंता अरुण पवार, अनिल चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक सुदेशना सवराते, जिल्हा औद्योगिक संघटनेचे रमेश पंडित, नितीन राठोड, संतोष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते. जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत औद्योगिक क्षेत्रामधील भूखंड संपले असून, अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र वाढविणे, यात वारंगा, दाभाडी, कुर्तडी, चुंचा मनाठा व वरवंटा येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट व एमएमएलपीसाठी संपादित क्षेत्र चौंडी तर्फे सेंदुरसेना येथे घेण्याबाबत तसेच सेनगाव व औंढा तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करावी. उद्योजकांना लागणाऱ्या सर्व परवानग्या तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करावी. हिंगोली औद्योगिक क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत संबंधित विभागाने जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला. औद्योगिक क्षेत्रात पाणीवापर धोरण बदलाबाबत निर्णय घेताना तसे बदल शासनाकडे सुचविण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. हिंगोली शहराजवळ भूखंड मिळाल्यास अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करुन ती वेगाने विकसित होऊ शकेल. त्यामुळे शहराजवळ जमीन मिळविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना उद्योजकांनी यावेळी उद्योग विभागाला केल्या. एमआयडीसी समोरील औंढा रोडवरील अतिक्रमण काढावे. तसेच या क्षेत्रातील ड्रेनेज लाईन, पथदिवे बसवणे, वीजपुरवठा सुरळीत करावेत, औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस सुरक्षा ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित यंत्रणेला दिले. *****

No comments: