28 July, 2025
जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या व केलेल्या कामांची जिओ टॅग छायाचित्रे गुरुवारपर्यंत उपलब्ध करुन द्यावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• चालू वर्षाचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत
• सन 2024-25 च्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र व खर्चाचा ताळमेळ तातडीने सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2024-2025 या वर्षात केलेल्या कामाचे काम करण्यापूर्वीचे व नंतरचे जीओटॅगची छायाचित्रे तसेच चालू वर्षाच्या कामाचे प्रस्ताव सादर करताना संबंधित कामाच्या ठिकाणाचे जीओटॅग छायाचित्रे गुरुवारपर्यंत उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे तसेच सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव कामाची यादी व जीओ टॅग छायाचित्रांसह प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावेत. यासोबतच सन 2024-25 या आर्थिक वर्षातील केलेल्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचा ताळमेळ अहवाल देखील त्वरित पाठवावा. पायाभूत विकासाच्या योजनांसाठी एमआर सॅक यांच्याकडून सर्व निधीचे ॲसेट क्रिएटीव्ह करण्यासाठी युनिक आयडी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या कार्यालयाची माहिती एक्सेलशीटमध्ये तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment