18 July, 2025
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सेवादूत प्रणालीचा शुभारंभ
• सेवादूत प्रणालीद्वारे सेवा देणारा हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातील पहिला जिल्हा ठरला-जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा प्रशासनातर्फे विकसित करण्यात आलेल्या सेवादूत या प्रणालीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुभारंभ करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, तहसीलदार आश्विनकुमार माने आदी उपस्थित होते.
या प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यातील जनतेला शासनाव्दारे राबविण्यात येणा-या विविध सेवा, कागदपत्रे घरपोच देण्यात येणार आहे. या प्रणालीच्या वापर करून हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला हवी असलेली कागदपत्रे आपल्या घरीच मिळविता येतील. त्यासाठी त्यांना Sewadoothingoli.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करून हवी असलेली सेवा घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडून विकल्प निवडून माहिती भरायची आहे.
ही माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत आपले सरकार सेवा केंद्र चालक आपल्याला फोन करून आपण निवडलेल्या वेळेस व दिवशी आपल्या घरी येऊन आपण निवडलेल्या सेवेसाठी सर्व प्रक्रिया आपल्या घरीच पूर्ण करून घेईल तसेच निवडलेल्या सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काची आणि कागदपत्रांची माहिती सुद्धा आपल्याला नोंदणी करत असतानाच मिळणार आहे. तेवढेच शुल्क आपणास आपल्या घरी येणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र धारकाला द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे आपण निवडलेली प्रमाणपत्रे शासनाच्या नियमानुसार तयार झाल्यानंतर आपल्या घरी तोच आपले सरकार सेवा केंद्राधारक घरपोच आणून देईल.
या प्रणालीमुळे लोकांचा वेळ आणि होणारा त्रास तसेच वारंवार आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन होणारा मनस्ताप थांबवता येईल.
ही सेवा शहरी भागातील नगर परिषद भागातील लोकांसाठी पुढील आठवड्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी सेवा देणारा हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
त्याचप्रमाणे अल्पावधीत व्हाट्सअपच्या माध्यमातून सुद्धा ही सेवा नागरिकांना लवकरच मिळणार असून राज्यातला हा पहिलाच प्रयोग ठरणार असल्याचेही यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment