25 July, 2025
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी जिल्ह्यातील तीन रुग्णालये संलग्नीत
पात्र व गरजू रुग्णांना 1 जानेवारीपासून 14 लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत
हिंगोली (जिमाका), दि. 25: मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते आतापर्यंत या कक्षामार्फत हिंगोली जिल्ह्यातील 17 रुग्णांना 14 लाख 10 हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे नोडल अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांनी दिली आहे.
राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत. परंतु नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलबध व्हाव्यात, म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हिंगोली येथे हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत कार्यरत आहे.
वैद्यकीय मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत हिंगोली जिल्ह्यातील उर्मिला हॉस्पिटल नांदेड रोड, हिंगोली, नाकाडे हॉस्पिटल हिंगोली, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली या तीन रुग्णालयांचा समावेश आहे. या निधीच्या मदतीतून रुग्ण या रुग्णालयात उपचार करुन घेतात.
गरजू व पात्र रुग्णांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष येथे संपर्क साधावा, असे डॉ. कोरडे यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment