17 July, 2025
जिल्हा व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि.17: तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करण्यात आला. तसेच इतर विषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन वकील संघ जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक अॅड. साहेबराव सिरसाठ यांनी वाढती लोकसंख्या यावर होणारे दुष्परिणाम व त्यावर उपाय यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. अॅड. अजय उर्फ बंटी देशमुख यांनी न्याय दिवसानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विनोद एम. मानखैर यांनीही उपस्थित पक्षकारांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. ए. अकाली यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस, वाढत चाललेली लोकसंख्या तसेच मध्यस्थीतून प्रकरणे निकाली काढल्यावर होणारे फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे सदस्य अॅड. सतीष देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनिल भुक्तार हे होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वि. म. मानखैर, मुख्य न्याय दंडाधिकारी अ. बा. कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. व्ही. सावरकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. आर. पमनानी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. व्ही. भंडारी, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. पळसुळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड. अखील अहेमद यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनिल भुक्तार यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment