10 July, 2025

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लॅपटॉप खरेदीसाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्हा परिषद हिंगोली यांच्यामार्फत सेस योजना सन 2025-26 अंतर्गत 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधीमधून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज/प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. या योजनेअंतर्गत पूर्वीची अंतिम मुदत 25 जून 2025 ही दिली होती. परंतु अधिक गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून 31 जुलै 2025 पर्यंत करण्यात आली आहे. अर्जदारांनी संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे आपले पूर्ण प्रस्ताव कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा. तो वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यासारख्या पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असावा. ही योजना डीबीटी तत्वावर राबवण्यात येणार असल्यामुळे लाभार्थ्यांनी प्रथम लॅपटॉप खरेदी करावा व मूळ खरेदी बीलासह प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर खरेदी किंमती इतके, परंतु कमाल 30 हजार रुपये अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येईल. विलंबाने आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे सांगितले आहे. *****

No comments: