21 July, 2025

वसमत तालुक्यातील 16 गावातील रास्त भाव दुकानासाठी 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरावेत

हिंगोली (जिमाका), दि. 21 : वसमत तालुक्यातील नागापूर, फाटा, कुरंदवाडी, जुनुना, महमदपूरवाडी, डिग्रस खाजमापूरवाडी, भोरीपगाव, सातेफळ, पारवा/पळसगाव, वाघी, खंदारबन, माटेगाव, आरळ, परजना, कोनाथा, कोहिनूर कॉलनी, गोविंदनगर, वसमत शहरी अशा एकूण 16 रास्तभाव दुकानासाठी 30 ऑगस्ट, 2025 पर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. याबाबतचे जाहीर प्रगटन तहसील कार्यालयामार्फत गावात डकवण्यात आलेले आहे. यासाठी भरावयाचे अर्ज तहसील कार्यालय, वसमत येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने दि. 6 जुलै, 2017 च्या शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येतील. ही रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील. अधिकृत स्वंय सहाय्यता गटांना प्राधिकारपत्राच्या अटी शर्तीच्या पालनार्थ भरावयाच्या प्रतिभूती ठेवीच्या रक्कमा चलनाव्दारे बँकेत शासन जमा नियमानुसार कराव्या लागतील. रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यासाठी प्राथ्यम्य सूची दि. 3 नोव्हेंबर, 2007 व दि. 25 जून, 2010 च्या शासन निर्णयानुसार विचारात घेतली जाईल. प्राथम्यसुचीनुसार गटांची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या गटास प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटाचे हिशोब व लेखे अद्यावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान 80 टक्के असावे. आवेदन करणाऱ्या संस्थांनी दि. 3 नोव्हेंबर, 2007, दि. 6 जुलै, 2017 व 1 ऑगस्ट, 2017 या शासन निर्णयांचे वाचन करुन आवेदन पत्र अचूक भरावेत. अर्ज भरण्याची मुदत ही दिनांक 22 जुलै, 2025 ते 20 ऑगस्ट, 2025 पर्यंत तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात स्वीकारण्यात येतील. वरील दाव्याचे पृष्ठीकरिता लेखी पुरावे सादर करणे आवश्यक आहे. स्वंय सहाय्यता बचत गटाची निवड करण्याचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी अध्यक्ष असलेली शासन नियुक्त समिती (त्या गावच्या महिला ग्रामसभेची शिफारस विचारात घेऊन) करील. सदरहू जाहिरनाम्यामध्ये अशंतः किंवा पूर्णतः बदल करण्याचे अधिकार निम्न स्वाक्षरीकाराने राखून ठेवले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments: